भाजपच्या महामंत्र्याने बौद्ध व्यक्तीला जाळले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपच्या महामंत्र्याने बौद्ध व्यक्तीला जाळले

Share This
गोंदिया - बौद्ध विहाराच्या वादग्रस्त जागेच्या वादावरून संजय निवृत्तीनाथ खोब्रागडे (५०) या बौद्ध व्यक्तीला जिवंत पेटविल्याची खळबळजनक घटना शनिवारी पहाटे गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथे घडली. त्यात संजय हे गंभीर भाजले असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. यातील आरोपींमध्ये गोरेगाव तालुका भाजपच्या महामंत्र्यासह चार जणांचा समावेश आहे. 

संजय हे शनिवारी पहाटे कुटुंबीयांसह वऱ्हांड्यात झोपले होते. अचानक पाच जण आले. त्यांनी संजय यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत पेटवून दिले. यात ते ९५ टक्के भाजले. संजय यांचा चेहरा, छाती, दोन्ही हात-पाय आणि गळा पूर्णतः भाजला आहे. त्यांना सर्वप्रथम गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचे बयान नोंदवण्यात आले. बयानात त्यांनी कवलेवाडा येथील गोरेगाव तालुका भाजप महामंत्री ऋषीपाल टेंभरे, माधुरी टेंभरे, श्रीप्रकाश रहांगडाले, भाऊलाल हरिणखेडे, पुनाजी ठाकरे व हेमंत ठाकरे यांनी आपल्याला पेटविल्याचे सांगितले. त्यावरून गंगाझरी पोलिसांनी या पाचही जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९ व ३०७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. 

सोबतच अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गतही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. प्रकृती ढासळल्याने संजय यांना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक १९ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.


संजय खोब्रागडेंची नितीन राऊत घेणार भेट
संजय खोब्रागडे यांना जिवंत जाळण्याचा प्रकार मला शनिवारी रात्री समजला आहे. संजय यांना रात्रीच नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे. याबाबत मी सतत डीन व रुग्णालयाशी सतत संपर्क ठेवला आहे. १९ मे ला सोमवारी सकाळी १०-११ वाजता भेट घेणार आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये घटना स्थळाला भेट देणार आहे. 
नितीन राऊत 
जलसंधारण मंत्री 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages