बौद्धानो जागे व्हा ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बौद्धानो जागे व्हा !

Share This

भारतीय जनता पक्षाचे सरकार बहुमताने येणार हे जाहीर झाल्या नंतर महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये बौद्ध विहाराच्या वादग्रस्त जागेच्या वादावरून संजय निवृत्तीनाथ खोब्रागडे (५०) या बौद्ध व्यक्तीला जिवंत पेटविल्याची खळबळजनक घटना शनिवारी (१७ मे २०१४) पहाटे गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथे घडली आहे. त्यात संजय खोब्रागडे हे गंभीर भाजले असून त्यांची प्रकृती ढासळल्याने संजय यांना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक १९ मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

संजय खोब्रागडे हे शनिवारी पहाटे कुटुंबीयांसह वऱ्हांड्यात झोपले होते. अचानक पाच जण आले. त्यांनी संजय यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत पेटवून दिले. यात ते ९५ टक्के भाजले. संजय यांचा चेहरा, छाती, दोन्ही हात-पाय आणि गळा पूर्णतः भाजला आहे. त्यांना सर्वप्रथम गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचे बयान नोंदवण्यात आले. बयानात त्यांनी कवलेवाडा येथील गोरेगाव तालुका भाजप महामंत्री ऋषीपाल टेंभरे, माधुरी टेंभरे, श्रीप्रकाश रहांगडाले, भाऊलाल हरिणखेडे, पुनाजी ठाकरे व हेमंत ठाकरे यांनी आपल्याला पेटविल्याचे सांगितले.

संजय खोब्रागडे यांनी दिलेल्या माहितीवरून गंगाझरी पोलिसांनी या पाचही जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९ व ३०७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अहमदनगर मधील खर्डा गावात २८ एप्रिलला उच्च जातीमधील मुलीशी असलेल्या प्रेम संबंधातून नितीन आगे याला शाळेमध्ये मारहाण करून जवळच्या मंदिरा जवळ नेवून त्याचा गळा दाबून खून करण्यात आला होता. शाळेमध्ये नितीन आगेला मारहाण करताना शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांनी त्याला वाचवले असते तर आज्ज नक्कीच नितीन जिवंत असता.

महाराष्ट्र पुरोगामी म्हटला तरी बौद्ध लोकांना मारहाण करणे, त्यांची हत्या करणे, जाळून मारणे, बहिष्कार टाकणे हे प्रकार सतत कुठे न कुठे होतच आहेत. नितीन आगेला राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे संचालक असलेल्या रयतच्या शाळेत मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणारे सुद्धा राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित होते, त्यांची या शाळेमध्ये दहशत असल्याने नितीन आगे याला मारहाण होताना कोणीही वाचवण्यास पुढे आलेले नाही. तर कालच गोंदिया मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याने संजय खोब्रागडे यांना जिवंत जाळले आहे.

बौद्ध धर्मीय एकत्र नसल्याने नितीन आगे याचा खून करण्याची आणि संजय खोब्रागडे यांना जाळण्याची हिम्मत इतर जातींच्या लोकांमध्ये निर्माण झाली आहे. बौद्ध धर्मीय नेते आणि जनता एकत्र नसल्याने इतर जाती धर्मातील लोकांचा आत्मविश्वास वाढत असून लोकांना जाळण्या पर्यंत, लोकांचे खून करण्याची हिम्मत केली जात आहे. दलित प्यांथरच्या काळात असे प्रकार एखाद्या गावात घडल्यास गाड्याच्या गाड्या घेवून शेकडो प्यांथर आपल्या बांधवांवर झालेल्या अन्याय अत्याचाराचा जाब विचारायचे. आता त्याच्या उलट होताना दिसत आहे. खून झाले जाळून मारले तरी बौद्ध धर्मियांकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.

आपल्याच बौद्ध धर्मीय बांधवाना मारहाण होताना, त्यांचे मुडदे पडले जात असताना काही अपवाद वगळता इतर बौद्ध धर्मीय आपल्या घरात बसून असल्याने बौद्ध धर्मीय लोक षंढ झाले का असा प्रश्न पडतो आहे. आम्ही रस्त्यावर उतरून जाळपोळ करा, तोडफोड करा, ज्यांनी आपल्या जातीतील लोकांना मारले, जाळले त्यांच्या हत्या करा असे सांगून आपल्यावर केसेस टाकून घ्या असे सांगत नाही. परंतू आपल्याच जातीतील लोकांवर अन्याय अत्याचार होत असताना किती दिवस गप्प बसून राहायचे याचा विचार प्रत्तेक बौद्ध धर्मियाने करायला हवा.

बाबासाहेबांनी अन्याय अत्याचार करणाऱ्या पेक्षा अन्याय अत्याचार सहन करणारा दोषी असतो असे म्हटले आहे. बाबासाहेबांचे नाव घेणाऱ्या बाबासाहेबांनी दिलेल्या सोयी सुविधा घेणाऱ्या प्रत्तेक बौद्ध धर्मियाने आता विचार करण्याची वेळ आली आहे. आज नितीन आगे, संजय खोब्रागडे यांच्यावर जो प्रसंग घडला आहे तसाच प्रकार कधी तरी तुमच्यावर सुद्धा होऊ शकतो, तेव्हाही तुमच्या सारखे विचार करणारे लोक घरात बसून तमाशा बघत राहतील. कोणीही मदत करायला, आवाज उठवायला पुढे येणार नाही याची नोंद प्रत्तेक बौद्ध धर्मियांनी घेतली पाहिजे.

"एकीचे बळ मिळते फळ" या म्हणी प्रमाणे आपण सगळे बौद्ध धर्मीय एकत्र राहिलो जागृत राहिलो आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या जातीमधील लोकांवर अन्याय अत्याचार होतात तेथील प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधी यांच्या कडे जाब विचारण्याचे जरी का केले, जो पर्यंत न्याय मिळत नाहीत तो पर्यंत सर्वत्र लाखोंच्या संखेने मोर्चे निदर्शने करण्याची गरज आहे. सरकारकडे स्थानिक प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून जाब विचारण्याची गरज आहे. बौद्ध लोकांचे नेते एकत्र नसले तरी अन्याय अत्याचार झाल्यास आपल्या जिल्ह्यामध्ये बौद्ध धर्मीय जनतेनेच पुढाकार घेवून एकत्रित पणे आवाज उचलण्याची गरज आहे. अन्यथा येणाऱ्या काळात जातीवादी आणि राजकारण्यांकडून सर्व बौद्ध धर्मियांचाच आवाज दाबला जाईल याची नोंद घ्यावी.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages