नौदल कर्मचार्‍यांच्या विधवा 'संरक्षण अधिकारी' बनणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नौदल कर्मचार्‍यांच्या विधवा 'संरक्षण अधिकारी' बनणार

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: चालू वर्षाच्या सुरुवातीला 'आयएनएस सिंधुरत्न' आणि 'आयएनएस कोलकाता'मध्ये वायुगळती होऊन घडलेल्या दुर्घटनांत प्राण गमावणार्‍या नौदल अधिकार्‍यांच्या पत्नींना संरक्षण अधिकारी बनण्यास मुभा देण्यात आली आहे. दोन पाणबुड्यांच्या दुर्घटनांत नौदलाच्या २१ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १७ जणांच्या कुटुंबीयांनी नोकरी मिळवण्यासाठी नौदलाची मदत मागितली आहे. नौदलाने ५ कर्मचार्‍यांच्या पत्नींना मेरिटाईम फोर्समध्ये संरक्षण अधिकारी बनण्यासाठी अर्ज भरण्यास मुभा दिली आहे.
शैक्षणिक पात्रतेच्या आधारे ५ अधिकारी आणि खलाशांच्या पत्नींना संरक्षण अधिकारी बनण्याच्या निवड प्रक्रियेसाठी काही प्रवर्गांत सूट देण्यात आली आहे, अशी माहिती नौदलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. मार्च महिन्यात माझगाव गोदीत बांधणी सुरू असताना 'आयएनएस कोलकाता' या विनाशिकेत वायुगळती होऊन झालेल्या दुर्घटनेत कमांडर कुंटल वाधवा यांना प्राण गमवावा लागला. त्यांची पत्नी 'सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड'ची चाचणी आणि वैद्यकीय तपासणीत उत्तीर्ण झाली असून लवकरच मेरिटाईम फोर्समध्ये रुजू होईल, असेही संबंधित अधिकार्‍याने स्पष्ट केले. पाणबुडी दुर्घटनांत प्राण गमावणार्‍या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश नौदल प्रमुख अँडमिरल रॉबिन धवन यांनी नौदल मुख्यालयातील अधिकार्‍यांना दिले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages