मुंबई/जेपीएन न्यूज: शासकीय दूध डेअर्यांकडे जाणारे दूध आपल्याकडे वळते करून ते बाजारात चढ्या दराने विकणार्या खासगी व सहकारी दूध डेअर्यांमुळे शासकीय दूध योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ही योजना बंद झाल्यास त्याचा दुष्परिणाम आरे दूध वितरक, ग्राहक आणि शेतकर्यांवर होणार आहे. हे निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्या राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा महाराष्ट्र दूध वितरक सेनेने दिला आहे.
सहकारी व खासगी दूध डेअर्या सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार दुधाची खरेदी-विक्री करत नाहीत. शासकीय दूध डेअर्यांना मात्र सरकारच्या दरानेच खरेदी-विक्री करावी लागते. शासकीय डेअरी आणि खासगी डेअर्यांच्या दुधाचा दर्जा व घनघटक समान आहेत, परंतु खासगी डेअर्या मात्र शासकीय डेअर्यांपेक्षा लिटरमागे ५ ते ६ रुपये जास्त आकारून ग्राहकांची लूट करत आहेत असा सेनेचे सरचिटणीस राम कदम व कार्याध्यक्ष नारायण रहाळकर यांचा आरोप आहे. मुंबईमध्ये आरे ३३ रुपये, अमूल ताजा ३८ रुपये, कृष्णा ३८ रुपये, महानंद ३८ रुपये, गोकुळ ३८ रुपये, मदर डेअरी ३८ रुपये दराने प्रती लिटर विकले जात आहे.
