कष्टकरी, कामगारांच्या घामाने मुंबई बनली आहे त्याच कष्टकरी, कामगाराला आज मुंबईत हक्काचा निवारा मिळेनासा झाला आहे. या वर्गासाठी परवडणारी घरेच बांधण्याचा विसर म्हाडा आणि बिल्डरांना पडल्याने कामगार मुंबईबाहेर फेकला जात आहे. त्यामुळे या वर्गाला हक्काचा निवारा मिळवायचा असेल तर आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे म्हणत हक्काच्या घरासाठी या वर्गाने एकत्र होत घर हक्क आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन तीव्र केले आहे. त्यानुसार ४ जूनला एक लाख बेघर कष्टकरी, कामगार आझाद मैदानावर धडकणार आहेत.
कामगार दिनाचे औचित्य साधून घर हक्क आंदोलनाने आजपासून परवडणार्या घरासाठीच्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. दादर-नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्रा. सुरेंद्र गावसकर सभागृहात बेघरांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार ४ जूनला सकाळी ११ वाजता कामगार, कष्टकरी बेघर जनता आझाद मैदानावर धडकत सरकारसमोर आपले गार्हाणे मांडणार असल्याची माहिती यावेळी घर हक्क आंदोलनाचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर यांनी दिली आहे.

