मुंबई - रोहा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेची चौकशी सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असून हा अहवाल एक महिन्यात सादर करण्यात येईल, तसेच त्यातील कारणांचा शोध घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच जखमी प्रवाशांचा वैद्यकीय खर्च रेल्वे प्रशासन उचलेल, अशी ग्वाही रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी आज शीव रुग्णालयात दिली.
रेल्वे दुर्घटनेतील जखमींना पाहण्यासाठी रेल्वेमंत्री थेट रोह्याला पोहोचले. त्यानंतर सायंकाळी सवासातच्या सुमारास शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.दरम्यान, रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना दहा लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी रेड कार्पेट - निर्लज्जपणाचा कळस
रोहा येथील स्थानिक रुग्णालयात जखमींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेले तेव्हा तेथील कर्मचार्यांनी निर्लज्जपणाचा कळसच केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी चक्क रेड कार्पेट अंथरले. पत्रकारांनी हे काय चालले आहे असे विचारताच हे रेड कार्पेट लगोलग हटविण्यात आले.

