मुंबई/जेपीएन न्यूज: बेस्टच्या बस चालक आणि वाहकांना १ जुलैपासून त्यांना १0 तासांच्या आत काम करावे लागणार असून २६ आगारांमध्ये नवीन ड्युटी शेड्युलची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हे नवे ड्युटी शेड्युल लागू झाल्यानंतर चालक आणि वाहकांना सर्वप्रथम पसंतीची आणि त्याखालोखाल सेवाज्येष्ठतेनुसार ड्युटी करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शरद राव यांनी दिली. यापुढे वाहक आणि चालकांना मनासारखे काम करण्यास मिळणार असल्यामुळे त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.
नियनच्या मागणीनुसार ड्युटी शेड्युलमध्ये बदल करण्याची तयारी महाव्यवस्थापकांनी दाखवली आहे, असा दावा राव यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, १ जूनपासून लागू होणार्या ड्युटी शेड्युलमध्ये बदल करण्याची युनियनची मागणी होती. त्यात उपक्रमाने सुधारणा केली आहे. सध्या १४ आगारांमध्ये जुन्याच वेळापत्रकाची अंमलबजावणी होत असून १ जूनपासून अन्य १२ आगारांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर नवीन ड्युटी शेड्युल लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर हे शेड्युल २६ आगारांमध्ये लागू करण्यात येईल.
नव्या शेड्युलसंबंधी माहिती देताना राव म्हणाले, १ जूनसाठी सध्या प्रदर्शित करण्यात आलेल्या १0 तासांच्या 'स्प्रेड ओव्हर' असलेल्या एकूण ड्युटी ४८५ होत्या, त्या कमी करून २९४ करण्यात आल्या आहेत. तर नव्या शेड्युलमध्ये चालक आणि वाहकांना एकच बस मार्ग देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून चालक आणि वाहकांच्या ४४ टक्के ड्युट्या तयार केल्या आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त कर्मचार्यांना पूर्ण आठवड्यात दोनपेक्षा जास्त बस मार्गांवर काम करावे लागू नये, अशी सुधारणा केली आहे. १ जुलैपासून २६ आगारांमध्ये नवीन ड्युटी शेड्युलची अंमलबजावणी करताना चालक-वाहकांना पसंतीची, सेवाज्येष्ठतेनुसार ड्युटी मिळेल, असे आंबोणकर म्हणाले. तशा सूचना उपक्रमातील संबंधित दोन वरिष्ठ अधिकार्यांना महाव्यवस्थापकांनी चर्चेदरम्यान दिल्या आहेत, असा दावा राव यांनी केला. बेस्टच्या कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या रेस्ट रूम, कॅण्टीन यात आमूलाग्र बदल करण्यात येणार असल्याचेही बेस्ट उपक्रमातर्फे मान्य केले आहे.
