मुंबईतील रस्त्यांसह टोलनाके पालिकेला द्या - महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील रस्त्यांसह टोलनाके पालिकेला द्या - महापौर

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: शहरातील रस्त्यांची देखभाल करण्यासाठी एकाच प्राधिकरणाची आवश्‍यकता आहे. त्यामुळे सर्व रस्ते महापालिकेच्या ताब्यात द्यावेत आणि त्याचबरोबर महसुलाचे साधन म्हणून टोलनाक्‍यांसह जाहिरातींचे हक्क द्या, अशी मागणी महापौरांनी राज्य सरकारकडे केली आहे.शिवसेनेने आतापर्यंत टोलनाक्‍यांना विरोधच केला आहे. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप युतीने राज्य सरकारला धारेवर धरले होते. आता शिवसेनेचे महापौरच उत्पन्नाचे साधन म्हणून टोलनाक्‍यांची मागणी करत असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई शहरात महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांचे रस्ते आहेत. सर्वाधिक लांबीचे रस्ते महापालिकेच्या अखत्यारित येतात. या रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले होते. रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा आल्यावर महापालिका नेहमीच हद्दीचा वाद निर्माण करते; मात्र आता खड्डेमुक्त रस्त्यांसाठी शहरातील सर्व रस्ते महापालिकेच्या ताब्यात द्या, अशी मागणी महापौर सुनील प्रभू यांनी केली आहे. रस्त्यांच्या देखभालीचा खर्च भागवण्यासाठी उत्पन्नाचे साधन म्हणून टोलनाके आणि रस्त्यांवरील जाहिरातींचेही हक्क महापालिकेला द्या, अशा मागणीचे पत्र ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवणार आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages