केईएम कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केईएम कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

Share This


मुंबई - केईएम रुग्णालयातील कर्मचारी आणि कामगारांच्या मागण्या प्रशासनाने तब्बल पाच तास चर्चा केल्यानंतर तत्त्वतः मान्यता केल्या. त्यामुळे केईएम म्युनिसिपल मजदूर युनियनने गुरुवारी सकाळी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले. 
युनियनचे चिटणीस महेश दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार- रोजंदारीवर असलेल्या सफाई कामगारांना आठ दिवसांत ओळखपत्र देण्याचे, तसेच शुक्रवारी दुपारपर्यंत स्टाफ क्वॉर्टर्स, टीकी ऑफिस मस्टर देण्याचे मान्य केले आहे. 

एक लाख कामगारांना आजवरची थकबाकी मेअखेरपर्यंत देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक कामगाराला एक लाख रुपये मिळणार आहेत. तसेच रेडिओलॉजी विभागाच्या मस्टरमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार नाव लिहिण्याचे मान्य करण्यात आले आहे. या मागण्यांच्या पूर्ततेबद्दल 17 मे रोजी बैठक होणार आहे, असे दळवी यांनी सांगितले. 

केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्या शुभांगी पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार- केईएम प्रशासनाने कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना वास्तवाचे भान ठेवून आणि सर्वसमावेशक विचार करून मान्यता दिली आहे. काही मागण्यांसंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. 

रिक्त पदांबाबत अर्हतेत बदल होणार असल्याने त्यानंतर भरती करण्यात येईल, असे पारकर यांनी सांगितले. सर्व्हिस क्वॉर्टर्सबाबत स्ट्रक्‍चर ऑडिट सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. कर्मचाऱ्याला घराची चावी दिल्यानंतर त्याला पुढे अडचण येऊ नये याबाबत काळजी घेणे आवश्‍यक आहे, असे त्या म्हणाल्या. त्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. 
67 शस्त्रक्रिया केल्या
कर्मचाऱ्यांनी काम बंद करून उपोषण सुरू केल्यानंतरही रुग्णालयात 67 शस्त्रक्रिया करण्यात आल्या, अशी माहिती केईएमच्या अधिष्ठात्या शुभांगी पारकर यांनी दिली. तत्काळ करावयाच्या या शस्त्रक्रिया होत्या; त्यापैकी 47 मोठ्या होत्या, असे त्या म्हणाल्या

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages