मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या 'बेस्ट'ला आणखी अडचणीत आणणारा निर्णय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बेस्टच्या कार्यक्षेत्रात विद्युत पुरवठा करण्यास टाटा वीज कंपनीला न्यायालयाने परवानगी दिल्याने बेस्टची मुंबई शहरातील मक्तेदारी संपुष्टात येणार आहे.
दक्षिण मुंबईतील नागरिकांना स्वस्तात टाटाची वीज मिळणार आहे.मुंबईत मात्र आतापर्यंत बेस्टचा एकमेव पर्याय वीज ग्राहकांना होता. टाटा पॉवरचे विजेचे जाळे विस्तारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दक्षिण मुंबईत वीजपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तसेच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये टाटा वीज कंपनी विद्युत पुरवठा करू शकत नाही, असा आक्षेप घेत बेस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुरुवातीला न्यायालयाने याबाबतचा निर्णय 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने टाटा वीज कंपनीच्या बाजूने निकाल दिला.
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना दक्षिण मुंबईतील वीज ग्राहकांना टाटा वीज कंपनीचाही पर्याय असून स्पर्धात्मक वीज किंमत ठरविल्याने ग्राहकांना फायदा होणार आहे. आतापर्यंत दक्षिण मुंबईत केवळ बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येत होता. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे बेस्टची मुंबई शहरातली वीजपुरवठय़ामधील मक्तेदारी संपुष्टात येणार असून ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे. मुंबई शहरात वीजपुरवठा करणार्या बेस्ट, टाटा आणि रिलायन्स या कंपन्यांच्या वीज दरांमध्ये तुलना केल्यास टाटाची वीज स्वस्त असल्याचे आकडेवारी सांगते.
त्यामुळे दक्षिण मुंबईतील ग्राहक आता सुखावणार आहे. टाटा पॉवरकडून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करण्यात आले असून या निर्णयामुळे दक्षिण मुंबईतील वीज ग्राहकांना टाटा वीजमध्ये स्थलांतरीत होता येणार आहे. सध्या दक्षिण मुंबईत बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो, मात्र मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये रिलायन्स आणि टाटा पॉवरचे वीज ग्राहक असून ग्राहकांना वीज संस्थेची निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे. आधीच डोक्यावर कर्जाचा प्रचंड बोजा असलेल्या बेस्ट उपक्रमाला या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे.

