"एल निनो" वादळामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"एल निनो" वादळामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट

Share This
पालिकेला विहिरी आणि कूपनलिकाची झाली आठवण 
मुंबई - मुंबईत विहिरी आणि कूपनलिका आहेत; परंतु त्यांची डागडुजी होत नाही. काही विहिरींतील पाण्याचा गैरवापर होतो, तर काहींच्या पाण्याचा स्रोत आटला आहे. कूपनलिकांची स्थितीही तशीच आहे. त्यांच्या सफाई आणि डागडुजीकडे पालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. "एल निनो' वादळ पावसाळ्यात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी मुंबईवर पाणीकपातीचे संकट आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्या सभागृहात आज सर्व सदस्यांचे "वादळ' घोंघावले आणि त्याने प्रशासनाला पाण्याच्या पर्यायी स्रोताची आठवण आली. साहजिकच तहान लागल्यावर विहीर खोदण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. 
"एल निनो' वादळामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याने जुलैपर्यंतच पुरेल एवढा साठा मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये आहे. भविष्यात पाणीकपातीची टांगती तलवार आहे. त्यामुळे पालिकेने पाण्याच्या पर्यायी स्रोताची चाचपणी करावी. त्यांना विशेष निधी द्यावा. विहिरी-कूपनलिका यांची साफसफाई आणि डागडुजी केल्यास संभाव्य संकटावर मात करता येईल, असे मत नगरसेवक अनिल पाटणकर यांनी व्यक्त केले. पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाविषयी त्यांनी पालिकेच्या सभागृहात चर्चा घडवून आणली. 

कूपनलिकांची दुरवस्था, विहिरींमधील गाळाचा उपसा, टॅंकरमाफिया, जलवाहिन्यांची गळती, झोपडपट्ट्यांमध्ये होणारा पाण्याचा गैरवापर, पाणीचोरी आदी नेहमी चर्चेला येणाऱ्या समस्यांबाबत 14 सदस्यांनी प्रशासनावर ठपका ठेवला. सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीवर बोट ठेवले. पाण्याच्या गंभीर विषयावर चर्चा होणार असल्याचे माहीत असतानाही संबंधित अधिकारी सभागृहात गैरहजर राहिल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. महापौर सुनील प्रभू यांनी प्रशासनाला धारेवर धरले. उपायुक्त आणि मुख्य अभियंत्यांनी सभागृहात उपस्थित राहायला हवे, असे त्यांनी ठणकावले. यापुढेही अधिकारी गैरहजर राहिले, तर सभा तहकूब करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. 
रेनवॉटर हार्वेस्टिंगची श्‍वेतपत्रिका निघणार मुंबईत झपाट्याने इमारती वाढताहेत. त्यांना भोगवटा प्रमाणपत्र दिले जात आहे. आतापर्यंत किती इमारतींनी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प पूर्ण केले? या योजनेची सद्यःस्थिती काय आहे? याची माहिती द्यावी, असे आदेश महापौर सुनील प्रभू यांनी पालिका प्रशासनाला दिले. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनीही त्याला संमत्ती दिली. 
मुंबईतील विहिरी उघड्या विहिरी - 2679 
स्लॅबने झाकलेल्या - 2164 
कूपनलिका - 2321

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages