मुंबई : कांजूर मार्ग पूर्व येथे महापालिकेच्या मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना त्यात रविवारी तीन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पर्यवेक्षकाला पोलिसांनी सोमवारी अटक केली. पर्यवेक्षकाची नेमणूक कंत्राटदाराने केली होती. या मृत कामगारांना विम्यापोटी एकूण २२ लाख रुपये मिळणार आहेत, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. हे दुर्दैवी कामगार ओरिसा, भुवनेश्वर येथील आहेत. ही घटना बेजबाबदारपणामुळे झाली असून हे काम करणार्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे पालिकेतील एका अधिकार्याने सांगितले.
या दुर्घटनेत समीर परदान (३५), राजकिशोर बिहारी (४७) आणि रघुनाथ धनेसर (३२) यांचा मृत्यू झाला. तर चार कामगार जखमी झाले. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले. हे मृत कामगार ओरिसाचे राहणारे असून, त्यांचे पार्थिव विमानाने ओरिसा आणि भुवनेश्वर येथे पाठविण्यात आले. कंत्राटदाराने त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत म्हणून २५ हजार रुपये दिले असल्याचे कळते. या मृत कामगारांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कमही मिळणार असून, ती एकूण २२ लाख रुपये असल्याचे समजते. या प्रकरणात दोषी असलेल्या कं त्राटदारावर पालिकेने कडक कारवाई करावी, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे.
