मुंबई - महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवणे म्हणजे दिव्य बनले आहे. प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धडपड पाहून महाविद्यालय प्रशासने डोनेशनच्या नावावर लाच मागतात. इंजिनीयरिंगला प्रवेशासाठी तर लाखो रुपये लाच मागितली जाते. परंतु आता या गैरप्रकारांना ‘चाप’ बसणार आहे. लाच मागितली गेली तर तातडीने तक्रार करा असे आवाहन ऍन्टी करप्शन विभागाने केले आहे.
बारावी सायन्सला प्रवेश देण्यासाठी २५ हजार रुपये लाच स्वीकारताना खालसा महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ऍण्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. प्रवेशासाठी लाच स्वीकारण्यात थेट प्राचार्यांपर्यंतच्या व्यक्ती गुंतलेल्या असतात हे या घटनेने सिद्ध केले. पण पालकांनीही अशा प्रकारे लाच न देता त्याची तक्रार करावी असे आवाहन ऍण्टी करप्शनने केले आहे. लाच मागणार्यांची तक्रार २४९२१२१२ किंवा १८००२२२०२१ या टोल फ्री क्रमांकावर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
