मुंबई - मुंबईची वाढती लोकसंख्या, इमारतींची वाढती संख्या यामुळे मुंबईतील अग्निशमन केंद्रांची संख्या कमी पडू लागली आहे. पुढील दहा वर्षांत शहराला आणखी २६ अग्निशमन केंद्रे बांधण्याची गरज आहे. मात्र ही केंद्रे बांधण्यासाठी मुंबईत जागाच शिल्लक नसल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिलेली आहे. याबाबत भूखंडासाठी विकास नियोजन खात्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे.
मुंबईत सध्या शहर व उपनगरात मिळून ३३ अग्निशमन केंद्रे आहेत. शहराच्या कानाकोपर्यात कुठेही आग लागली तरी वेळेत पोहोचून आग विझवण्याची जबाबदारी अग्निशमन दलावर येते. शहराचा पसारा उभाआडवा वाढत असताना अनेकदा ट्रॅफिकमुळे घटनास्थळी पोहोचणे अवघड होते. त्यामुळे पुढील दहा वर्षांत २६ नवीन अग्निशमन केंद्रे बांधण्याचा, अग्निशमन दलाचे मजबुतीकरण करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
अग्निशमन केंद्रांची गरज पाहता भूखंड उपलब्ध न झाल्यास वॉर्ड कार्यालयांच्या जागेत अग्निशमन दलाच्या गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था करता येईल तसेच दलातील कर्मचार्यांसाठी कार्यालयात जागाही उपलब्ध करून देण्यात येईल, असाही उपाय स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सुचविला आहे. २६ नवीन अग्निशमन केंद्रांपैकी केवळ सात केंद्रांसाठी भूखंड आरक्षित आहेत. तर अन्य १८ केंद्रांसाठी भूखंड उपलब्ध नसल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाने शहरातील कोणकोणत्या कार्यक्षेत्रात केंद्रांची आवश्यकता आहे. त्याची यादी तयार केलेली आहे.
आवश्यक भूखंड अग्निशमन केंद्रे उपलब्ध नाहीशहर १५ ०५ ४
प. उपनगरे १२ ११ ८
पू. उपनगरे ०६ १० ६
एकूण ३३ २६ १८
