कोंकण रेल्वेने अपघाताची जबाबदारी ढकलली मध्य रेल्वेवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोंकण रेल्वेने अपघाताची जबाबदारी ढकलली मध्य रेल्वेवर

Share This
मुंबई : दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीला रविवारी जो अपघात झाला, त्याचे प्राथमिक कारण वेल्ड फेल्युअर (वेल्डिंग खुलणे) असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळाचे वेल्डिंग तुटल्यामुळे रेल्वे रुळाचे दोन तुकडे झाले होते. वेल्डिंग खुले झाल्यामुळे पिशप्लेटसुद्धा वेगळे झाले होते. या अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्त चौकशी करीत आहेत.

दिवा-सावंतवाडीला रविवारी भिसेखिंडदरम्यान अपघात झाला होता. रेल्वे रुळाचे जे दोन तुकडे झाले आहेत, ते दोन्ही तुकडे तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. तपासणीनंतरच हे कळू शकेल की वेल्डिंगमध्ये चूक होती की गाडी ओव्हर स्पीड होती. दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला अपघात होण्यापूर्वी १५ मिनिटे आधीच या मार्गावरून संपर्क क्रांती एक्स्प्रेसला (१२२१७) रवाना करण्यात आले होते. संपर्क क्रांती एक्स्प्रेस सकाळी ९.२३ वाजता नागोठणे येथे पोहोचली होती. त्यानंतर दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीला रवाना करण्यात आले होते. 

दिवा-सावंतवाडी गाडीचे इंजिन ज्या पद्धतीने रेल्वे रुळावरून घसरले, ते पाहता गाडी ओव्हर स्पीडमध्ये होती, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे टनेल अणि कर्व्ह असल्यामुळे ६0 किमी प्रति तास स्पीडची र्मयादा आहे. रेल्वेच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेला सेक्शन हा फार छोटा आहे, त्यामुळे गाडी अति वेगाने चालविण्याची शक्यता जरी कमी असली तरी घसरलेले इंजिन पाहता गाडीचा वेग जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इंजिनच्या ड्रायव्हर केबिनमध्ये दिवा-सावंतवाडी पॅसेंजरच्या २ ड्रायव्हरांसोबतच इतर २ ड्रायव्हरही होते, जे ऑफ ड्युटी होते. त्यामुळे रेल्वेच्या रेकॉर्ड बुकमध्ये त्याची नोंद नाही. रेल्वेच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, दोन जादा ड्रायव्हर गाडीत असल्यामुळे ड्रायव्हरचे लक्ष गाडीवरून हटले असण्याची शक्यताही आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages