क्षय, मलेरियाच्या मृतांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करा - मुख्य माहिती आयुक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 May 2014

क्षय, मलेरियाच्या मृतांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करा - मुख्य माहिती आयुक्त

मुंबई- क्षय आणि मलेरियाच्या आजाराने मरण पावलेल्या रुग्णांची यादी त्यांच्या पत्त्यासह महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा आदेश राज्य मुख्य माहिती आयुक्तांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. आत्तापर्यंत साथीच्या किंवा संसर्गजन्य आजारांनी मृत झालेल्या रुग्णांची नावे प्रसिद्ध केली जात नव्हती; मात्र माहिती आयुक्तांनीच हा निर्णय घेतल्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
प्रजा फाऊंडेशनने 2013 मध्ये भायखळा वगळता शहरातील सर्व भागांतील मलेरिया आणि क्षय रोगाने मृत झालेल्या व्यक्तींची यादी माहितीच्या अधिकारांतर्गत मागवली होती; मात्र जनमाहिती अधिकाऱ्याने ती निर्धारित वेळेत न दिल्यामुळे प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील केले होते. पालिकेने प्रत्येक टप्प्यावर ही माहिती नाकारल्यामुळे अखेरीस या प्रकरणाची सुनावणी राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडे झाली. या वेळी संबंधित माहिती फांऊडेशनला 19 मेपर्यंत द्यावी, असे आदेश देण्यात आले. त्याचसोबत ही यादी जून महिन्याच्या अखेरपर्यंत संकेतस्थळावर जाहीर करावी, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

साथीच्या किंवा संसर्गजन्य आजाराने मृत झालेल्या व्यक्तींची नावे जाहीर न करण्याची पालिकेची प्रथा असून, ती आतापर्यंत पाळली जात आहे. क्षय रोगाबाबत समाजात अद्याप अज्ञान असल्याने त्या व्यक्तीचे नाव जाहीर केल्यास त्याच्या कुटुंबीयांवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने पालिका अशा रुग्णांची नावे जाहीर करत नाही; मात्र आता माहिती आयुक्तांनीच आदेश दिल्यामुळे पालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS