प्रवेशासाठी पैसे घेतल्याने 'खालसा'चे प्राचार्य अटकेत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रवेशासाठी पैसे घेतल्याने 'खालसा'चे प्राचार्य अटकेत

Share This


मुंबई - येथील नामांकित महाविद्यालयांपैकी एक समजल्या जाणाऱ्या माटुंगा येथील खालसा महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी लाच घेतली जात असल्याचा प्रकार लाचलुचपतविरोधी पथकाने उघडकीस आणला. बारावी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व महिला स्वीय सहायकाला एका विद्यार्थिनीच्या पालकाकडून 25 हजारांची लाच घेताना लाचलुचपतविरोधी पथकाने अटक केली. 
बारावी विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी एका पालकाने 6 मे रोजी माटुंगा येथील गुरूनानक खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य अजित सिंग थेटी व त्यांच्या स्वीय सहायक निकिता वैद यांची भेट घेतली. या वेळी वैद यांनी पालकांकडे त्यांच्या मुलीच्या प्रवेशासाठी 30 हजारांची मागणी केली. या रकमेची त्यांना कोणतीही पावती मिळणार नाही, असे सांगण्यात आले. ही रक्कम प्राचार्य व त्यांच्यासाठी असल्याचे कळाल्यावर या पालकाने थेट लाचलुचपतविरोधी पथकाशी संपर्क साधला. महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांच्या सहायकाविरुद्ध तक्रार दिल्यानंतर 7 मे रोजी ते पुन्हा महाविद्यालयात गेले. तेव्हा निकिता वैद यांना भेटून 25 हजार रुपयांवर महाविद्यालयीन प्रवेशाचा हा सौदा पक्का झाला. प्रवेशासाठी आज सकाळी वैद यांच्याकडे 25 हजारांची लाच देताना लाचलुचपतविरोधी पथकाने त्यांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून, प्राचार्य थेटी यांनासुद्धा अटक करण्यात आली. मुंबई विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी "बेस्ट कॉलेज ऑफ अर्बन एरिया' या पुरस्काराने गौरव केलेल्या या महाविद्यालयाला तब्बल 75 वर्षांची परंपरा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या महाविद्यालयात प्राचार्यानेच केलेल्या लाचखोरीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages