भारतीय समाजव्यवस्थेने पिढ्यानपिढ्या ज्ञानापासून वंचित ठेवलेल्या गरीब, दुबळ्या व मागासवर्गातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे व त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रगतीला वाव मिळावा या उद्दात्त हेतूने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पिपल्स सोसायटीचे सिद्धार्थ महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय आणि वडाळ्यातील सिद्धार्थ विहार वसतिगृह ही आंबेडकरी चळवळीची केंद्रेच झाली. सामाजिक-सांस्कृतिक क्रांतीच्या उठावाची ती ठाणी झाली होती. सिद्धार्थ विहारातूनच दलित पँथरचा झंझावात सुरू झाला आणि त्याने महाराष्ट्रच नव्हे तर सारा देश ढवळून काढला होता.
याच सिद्धार्थ वसतिगृहामध्ये ‘दलित पँथर’ या क्रांतिकारी संघटनेचा जन्म झाला, जेथे आंबेडकरी समाजातील रामदास आठवले, राजा ढाले, नामदेव ढसाळ असे रथी-महारथी नेते, कवी निपजले, सत्तरीच्या दशकात दलित साहित्य आणि चळवळीचे तुफान जेथे उठले त्या वडाळ्याच्या सिद्धार्थ वसतिगृहावर लवकरच हातोडा पडणार आहे. मुंबई मधील धोकादायक असलेल्या इमारती मध्ये सिद्धार्थ वसतिगृहाचे नाव असल्याने महानगरपालिकेने वसतिगृह खाली करण्याची नोटीस दिली आहे. सिद्धार्थ वसतिगृहाचे १९६३ साली या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले होते. १९८५ मध्ये वसतिगृह कोणतेही कारण न देता बंद करण्यात आले आहे. वसतिगृह अधिकृतरित्या २२ वर्षे सुरु ठेवण्यात आले या काळात हजारो विद्यार्थी पदव्या घेवून वस्तीगृहामधून बाहेर पडले आहेत. आजही वसतिगृह बंद असले तरी मुंबई मध्ये भाड्याने जागा घेणे परवडणारे नसल्याने कित्तेक विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी वसतीगृहामध्ये राहत आहेत.
बाबासाहेबांच्या पिपल्सच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. सिद्धार्थ वसतिगृहाच्या मागील बाजूस कित्तेक अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या असून या जागेवर बेकायदेशीर एसआरए प्रोजेक्ट राबवले जात आहेत. मुबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी हे सर्व बेकायदेशीर एसआरए प्रोजेक्ट अनधिकृत असून प्रोजेक्ट बंद करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. एकीकडे पिपल्सच्या जमिनी बिल्डर गिळंकृत करत असताना सिद्धार्थ वसतिगृहाचा जागेवरसुद्धा बिल्डरांचा डोळा आहे. १९६३ मध्ये स्थापन केलेल्या वसतिगृहाची गेल्या ५० वर्षामध्ये एकदाही डागडुजी करण्यात आलेली नाही. वसतिगृह दुरुस्त करावे म्हणून आमदार खासदारांचा करोडो रुपयांचा निधी मिळाला परंतू वसतिगृहाचा प्रवेशाचा भाग सोडल्यास कोठेही दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही. पिपल्स सोसायटीकडे करोडो रुपयांची संपत्ती असताना, हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असताना गेल्या ५० वर्षामध्ये वसतिगृहाच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे असेच म्हणावे लागेल.
आंबेडकरी जनतेचे आंम्हीच नेते आहोत असे म्हणणाऱ्या नेत्यांमध्ये पिपल्स ताब्यात घेण्यावरून वाद सुरु आहे. वसतिगृहामध्ये काही नेत्यांनी आपली कार्यालये थाटली आहेत. आज तेच नेते वसतिगृहामध्ये गुंड राहतात, वसतिगृह तोडून टाका अशी भाषा करत आहेत. आंबेडकरी चळवळीतील आताच्या नेत्यांना बाबासाहेबांनी स्थापन केलेली कोणतीही संस्था पुढे घेवून जाता आली नाही. आंबेडकरी नेते म्हणवणाऱ्या नेत्यांनी या संस्थेची वाट लावण्याचे काम गेल्या कित्तेक वर्षात केले आहे. आज या जागेमध्ये गुंड राहत असते तर या गुंडानी वसतिगृहावर अतिक्रमण केले असते. येथील विद्यार्थ्यांनी, कार्यकत्यांनी वसतिगृह अतिक्रमण होण्यापासून वाचवले आहे. त्यांनाच गुंड बोलणे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची गरज आहे.
पालिकेने वसतिगृह खाली करण्याची नोटीस दिली आहे. अशीच नोटीस सन २०११ मध्येही देण्यात आली होती. पिपल्सच्या एम.एस. मोरे, एस.पी. गायकवाड, गांगुर्डे, बालकृष्णन या अधिकृत ट्रस्टीनी वसतिगृह खाली करण्यास नकार दिल्याने पालिकेने या ट्रस्टीवर न्यायालयामध्ये फौजदारी केस दाखल केली होती. न्यायालयाने याप्रकरणी पालिकेला चपराक देत ट्रस्टीना निर्दोष मुक्त केले आहे. पालिकेला एखादी खाजगी इमारत धोकादायक असल्यास ती खाली करण्यासाठी नोटीस देता येते. इमारत खाली करण्याचा अधिकार पालिकेला नाही. धोकादायक इमारत खाली करता यावी यासाठी पालिकेला अधिकार नसल्याने पालिकेला असे अधिकार द्यावेत अशी मागणी मुंबईच्या महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अशी परिस्थिती असताना "बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना" या म्हणी प्रमाणे रामदास आठवले यांनी ट्रस्ट मध्ये आपण कोणत्याही पदावर नसताना, पालिकेतील नियमांची कोणतीही माहिती न घेताच पालिकेमध्ये आपली सत्ता असल्याचा फायदा उचलत सिद्धार्थ वसतिगृह पडण्याची घोषणा केली आहे. मागील आठवड्यामध्ये आठवलेंच्या एका कार्यकर्त्याने आंबेडकरी जनतेचे कट्टर विरोधक असलेल्या शिवसेनेच्या राहुल शेवाळे व नगरसेवक हेमंत ढोके यांना घेवून वसतिगृहाची पाहणी केली. शेवाळे यांना आपण स्थायी समितीचे अध्यक्ष नसल्याचे भान नसल्याने व लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायचा बाकी असताना आपण खासदार व्हायचे बाकी असताना शेवाळे यांनी फंडामधून वसतिगृह दुरुस्त करू अशी घोषणा केली आहे.
एकीकडे वसतिगृह पाडा म्हणायचे आणि दुसरीकडे आपली सत्ता असलेल्या शिवसेनेला आंबेडकरी जनतेमध्ये हिरो बनवण्यासाठी फंडामधून वसतिगृह दुरुस्त करू अशी घोषणा करवून घ्यायची हे राजकारण असल्याचे आंबेडकरी जनतेला माहित आहे. यामुळे आता राजकारण करण्याची गरज नसून सिद्धार्थ विहार वसतिगृह वाचवण्याची गरज आहे. वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पर्याय म्हणून तात्पुरते मोकळ्या जागेवर वसतिगृह उभारायला हवे. जेणे करून या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करता येईल त्यांची शैक्षणिक वर्षे वाया जाणार नाहीत याची सर्वानीच काळजी घेण्याची गरज आहे. पिपल्सच्या एम.एस. मोरे, एस.पी. गायकवाड, गांगुर्डे या ट्रस्टीनी त्वरित वस्तीगृहामधील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी वसतिगृह बांधावे व नंतरच वसतिगृह पाडावे अशी भूमिका पालिकेला पटवून देण्याची जबाबदारी स्वीकारावी.
विद्यार्थ्यांसाठी तात्पुरते वसतिगृह बांधल्या नंतरच आताचे वसतिगृह तोडावे लागेल. अन्यथा एकदा का वसतिगृह पाडले कि ते पुन्हा कधीही उभे राहणार नाही. या कारणामुळेच वसतिगृह पाडायला विरोध होत आहे. आंबेडकरी नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची संस्था वाढवली नाही, त्या संस्थेच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ दिले. यामुळे आंबेडकरी समाजात नेत्यांच्या विरोधात तीव्र संताप आहे. आता वसतिगृह आणि त्याची जागा वाचवण्यासाठी नेत्यांनी राजकारण केल्यास त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागणार असल्याने आंबेडकरी नेत्यांनी वेळीच वसतिगृह वाचवण्यासाठी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे वाचवण्यासाठी पुढाकार घेवून आधी पर्यायी वसतिगृह उभे करावे नंतरच वसतिगृह तोडण्याची भाषा करावी, अन्यथा आंबेडकरी जनतेशी गाठ आहे हे विसरू नये !
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment