सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने व्हावा - सुप्रिया सुळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2014

सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने व्हावा - सुप्रिया सुळे



मुंबई - सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहेच, मात्र त्याचा वापरही तितक्‍याच जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करायला हवा. पत्रकार सचिन परब यांच्या ब्लॉगवरून केलेल्या पुस्तकातून हे लक्षात येते. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील प्रश्‍नांचा वेध यामध्ये घेण्यात आला आहे, मात्र तरीही छापील पुस्तकाला पर्याय नाही हे स्पष्ट होते, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केले. 
सचिन परब यांनी ब्लॉगवर लिहिलेल्या लेखांचे "माझे आभाळ' या पुष्पक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. एखाद्या घटनेवर ट्विट केले नाही, तर त्या प्रश्‍नाची त्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे समजच नाही असे मानले जाते. ज्ञान दाखवण्याच्या नादात अनेक मंत्र्यांनाही त्याचा फटका बसला आहे. मी जाणीवपूर्वक या सगळ्याला दूर ठेवले आहे. मात्र परब यांच्या पुस्तकातून सोशल मीडियाचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित होते, असे सुळे म्हणाल्या. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या प्रकाशनप्रसंगी विरोधी पक्षनेते विनोद तावडे, राहुल शेवाळे, "कृषीवल'चे संजय आवटे, पुष्पक प्रकाशनाचे संजय सोनावणी आदी मान्यवर उपस्थित होते. 

दहिहंडीपासून ते अखिलेश यादवपर्यंत विविध विषयांचे विश्‍लेषण परब यांच्या पुस्तकात आहे. त्यांच्या अष्टपैलू विचारांची चुणूक यातून दिसते. काही वर्षांतील घडामोडींचा रिकॅप यातून दिसतो. यात सहजपणा, साधेपणा आहेच, मात्र मांडणी ठोस असल्यामुळे हे पुस्तक मनाचा ताबा घेते, असे विनोद तावडे म्हणाले, तर घटनेचे केवळ वृत्तांकन करण्याऐवजी त्या प्रक्रियेचे वृत्तांकन केल्यामुळे संबंधित विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे यापैकीच विचार करायला भाग पाडणारे लेखन आहे. कोणत्याही लाटेबद्दलची सहमती सगळेच जण दाखवत असतात, असहमती दाखवणाराही हवा असतो ती जागा परब यांच्या लेखनाने भरून काढल्याचे कौतुकोद्‌गार "कृषीवल'चे संजय आवटे यांनी काढले.

Post Bottom Ad

JPN NEWS