केईएमच्या दोषी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केईएमच्या दोषी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

Share This
मुंबई/जेपीएन न्यूज: केईएम रुग्णालयातील डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करून केईएम रुग्णालयातील दोषी डॉक्टर व नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सतत दोन वर्षे पाठपुरावा करणार्‍या मृत महिलेच्या पतीला काही अंशी न्याय मिळाला आहे. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी चार डॉक्टर व दोन नर्सच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत, पुरावे नष्ट करणे, खोटी माहिती देणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. 
लालबाग येथे राहणारे रमेश सोनोने यांची पत्नी ममता सोनोने यांना केईएम रुग्णालयात २0 सप्टेंबर २0१२ रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे चुकीचे इंजेक्शन दिल्याने ममता यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत ममता यांचे पती रमेश सोनोने हे केईएमच्या डीन संध्या कामत यांच्या केबिनमध्ये २८ नोव्हेंबर २0१२ रोजी चौकशीसाठी गेले असता सोनोने यांना बाहेर ताटकळत ठेवून सुरक्षारक्षकांसह केबिनमध्ये बोलावून मला यापुढे पत्नीच्या मृत्यूबाबत विचारायचे नाही, डॉक्टर व नर्स यांची काही चुकी नाही, अशी दमदाटी करून तुम्ही पुन्हा केबिनमध्ये आलात तर पोलीस कारवाई करण्यात येईल, असे धमकावले होते. 

या वेळी त्यांना सुरक्षारक्षकांद्वारे धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले. न्याय मागण्यासाठी गेलेल्या सोनोने यांना अशा प्रकारे डीनकडूनच वागणूक मिळाल्याने त्यांनी या अन्यायाविरोधात लढा देण्याचे ठरवले. पत्नीचा मृत्यू डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची तक्रार सोनोने यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोनि. पोपट आव्हाड करत होते. केईएम प्रशासनाकडे ममता यांना वॉर्ड क्र. ४-ए मध्ये दाखल केले होते. त्या वॉर्डच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी सोनोने यांनी केली होती, मात्र वॉर्ड क्रमांक ४-ए मध्ये सीसीटीव्ही बसवले नसून ते वॉर्डच्या बाहेर आहेत, अशी खोटी माहिती पोलिसांना पुरवल्याचा प्रकारही केईएम प्रशासनाकडून झाल्याचे उघड झाले होते. 


गुन्हा लपवण्यासाठी वार्डमध्ये सीसीटीव्ही असतानाही सीसीटीव्ही नाही म्हणून खोटी माहिती देणार्‍या केईएम प्रशासनाविरोधात सोनोने यांना आणखी एक पुरावा मिळाल्याने त्याच्या आधारे भोईवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल करून त्याचा पाठपुरावा करत मुंबई मनपा आयुक्त, आरोग्य मंत्री, पोलीस आयुक्त आदींकडे पाठपुरावा करून अखेर या प्रकरणात दोषी असलेल्या डॉ. राहुल अरोरा, डॉ. धीरज अगरवाल, डॉ. सुयोग भागवत. डॉ. पाझारे, नर्स तिलोत्तमा माने, नर्स मानसी बिरवाडकर यांच्याविरोधात कलम ३0४(२), २0१, ४६५ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages