मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) भारतीय रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाचे स्थान असलेली मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर धावणारी आणि प्रवाशांची पहिली पसंत असणारी डेक्कन क्वीन १ जून रोजी ८५ वर्षे पूर्ण करत आहे. यानिमित्ताने पुण्याहून डेक्कन क्वीन सुटताना आणि मुंबईत पोहोचल्यावर तिचे जंगी स्वागत होणार आहे.
ब्रिटिशांच्या काळात घाटमाथ्यावर रेल्वे मार्ग टाकण्यात आला होता. तत्कालीन परिस्थितील ब्रिटिशांसाठी खंडाळा आणि लोणावळा थंड हवेची ठिकाणे होती. तसेच पुणे शैक्षणिक आणि महत्त्वाचे शहर होते. त्यामुळे पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडण्यासाठी लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसची गरज भासू लागली. प्रवाशांची वाढती मागणी आणि इतर बाबी लक्षात घेता १ जून १९३0मध्ये पहिली डेक्कन क्वीन धावली. पुणे आणि कल्याण या स्थानकांदरम्यान पहिल्यांदा क्वीन धावली. प्रवाशांची मागणी लक्षात घेता अखेर सीएसटीहून क्वीन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या काळात रविवारी धावणारी डेक्कन क्वीन पहिली डिलक्स लांब पल्ल्याची गाडी होती. सुरुवातीच्या प्रवासात डेक्कन क्वीन २ रॅक्स आणि ७ कोचवर धावत होती. सोनेरी आणि चंदेरी रंगाची झालर क्वीनच्या डब्यांना देण्यात आली होती. क्वीनचे मूळ रॅक्स इंग्लंडमध्ये बांधण्यात आले होते. तर कोचची बॉडी माटुंगा येथील जीआयपी रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये उभारण्यात आली होती.
प्रथम आणि द्वितीय क्लासमध्ये धावणार्या क्वीनला प्रवाशांकडून चांगलीच मागणी होती. १ जानेवारी १९४९ रोजी प्रथम क्लासचा डबा रद्द करण्यात आला. त्यानंतर द्वितीय क्लासचे रूपांतर प्रथम क्लासमध्ये करण्यात आले. १९५५मध्ये तृतीय क्लासचा डबा वाढवण्यात आला. इंग्रजांच्या काळातील बॉडी जीर्ण झाल्यामुळे १९६६ मध्ये पेरुंबुदुर रेल्वे वर्कशॉमधील कोच क्वीनला देण्यात आले. नवा साज आणि रंगामुळे क्वीनचे सौंदर्य घाटातून जाताना खुलून दिसत होते. पुणे आणि मुंबई मार्गे जाणार्या हजारो रेल्वे प्रवाशांची संख्या, त्यांच्या मागणीनुसार क्वीनचा डबा, आहाराचा दर्जा आणि इतर सुविधांमध्ये बदल करण्यात आला आहे. सध्या क्वीन १७ डब्यांवर धावत आहे. यामध्ये ४ एसी चेअर कार, एक आहार डबा, १0 द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.
