मुंबई : जुहू येथील कूपर रुग्णालयात महापालिकेचे एक हजार खाटांचे पाचवे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी जुलैमध्ये सुरू होणार आहे. महापालिकेकडून त्याची सर्व प्रक्रिया सुरू असून, राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे पथक शुक्रवारी येथे पाहणी करणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी पालिका सभागृहाला सांगितले.
कूपर रुग्णालयात पालिकेचे पाचवे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे 'इसेंसिशियल' प्रमाणपत्र राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवले असून, ३१ ऑगस्टला केंद्र सरकारकडे याबाबत बैठक होणार आहे. नोव्हेंबरमध्ये 'इंडियन मेडिकल कौन्सिल' कूपरला भेट देऊन तेथे पाहणी करणार आहे. १५ जुलै २0१५ मध्ये पालिकेचे पाचवे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न जारी आहेत, असे देशमुख म्हणाले. भांडुप येथेही पालिकेतर्फे १00 खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
त्याच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या होत्या. १५ निविदाकारांपैकी आठ जणांनी काही अटींची पूर्तता केली नसल्याचे तर सहा जणांनी निविदा अपुर्या भरल्या होत्या आणि एका निविदाकाराने सशर्त निविदा भरली होती. यामुळे निविदा प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे. रुग्णालयाचे बांधकाम करणार्या कंत्राटदाराला ३00 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा अनुभव असला पाहिजे, अशी अट घालण्यात आली असून, ही निविदा प्रक्रिया जुलै संपण्याच्या आत पूर्ण होणार आहे, असे देशमुख म्हणाले. भांडुपचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय महापालिकाच उभारणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
