झुरिच : स्विस बँकेत काळा पैसा जमा करणार्या संशयित भारतीयांची एक यादी स्वित्झर्लंड सरकारने तयार केली असून ही यादी लवकरच भारत सरकारच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. यामुळे काळय़ा पैशाविरोधात भारतात सुरू असलेल्या लढय़ाला ताकद प्राप्त होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, स्विस प्रशासनाकडून यादी प्राप्त होताच वेगाने पुढील कारवाई करण्यात येईल, असे या प्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटीने स्पष्ट केले आहे.
देशातील विविध बँकांत ठेव ठेवणार्या खर्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी करण्यात आलेल्या सरकारी चौकशीत काही भारतीय व्यक्ती व संघटनांची नावे पुढे आली आहेत, अशी माहिती स्विस सरकारच्या एका वरिष्ठ अधिकार्याने रविवारी दिली आहे. त्या व्यक्ती व संस्थांनी ट्रस्ट, निवासी कंपन्या तथा भारताबाहेरील बेकायदेशीर कंपन्यांमार्फत करचुकवेगिरी करून स्विस बँकेत पैसा जमा केल्याचा संशय आहे, असेही त्या अधिकार्याने सांगितले. मात्र, गोपनीयतेचा दाखला देत त्याने या लोकांनी जमा केलेल्या रकमेचा कोणताही आकडा सांगितला नाही. स्विस अधिकारी भारताच्या नव्या सरकारसोबत जवळून काम करण्यास तयार असून, या प्रश्नी भारतात गठीत करण्यात आलेल्या 'एसआयटी'ला आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार आहेत, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
स्विस बँकेत जमा असलेला भारतीय पैसा हजारो अब्ज डॉलर्समध्ये असल्याचे वृत्त मात्र या अधिकार्याने या वेळी फेटाळले. स्विस नॅशनल बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील २८३ बँकांत परदेशातील व्यक्तींचा सुमारे १ हजार ६00 अब्ज डॉलर्स एवढा पैसा आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, स्विस प्रशासनाने पुरवलेल्या यादीचे सत्यापन केल्यानंतर त्यात दोषी आढळणार्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे या प्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख न्यायमूर्ती एम. बी. शाह यांनी स्पष्ट केले आहे.
भारत ५८ व्या क्रमांकावर
स्विस बँकेत काळा पैसा ठेवणार्यांच्या यादीत ग्रेट ब्रिटन अव्वलस्थानी असून आपला भारत ५८व्या क्रमांकावर आहे. हे प्रमाण स्विस बँकेत पडून असलेल्या परदेशी नागरिकांच्या १ हजार ६00 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत केवळ 0.१५ टक्के एवढे आहे. ब्रिटननंतर अमेरिका, वेस्ट इंडीज, र्जमनी तथा गुअर्नसे यांचा क्रमांक लागतो. काळा पैसा लपवणार्यांच्या या यादीत शेजारच्या पाकिस्तानने ६९ वे तर चीनने ३0वे स्थान पटकावले आहे. ब्राझील, रशिया तथा दक्षिण आफ्रिकेतील लोकांची ठेवही भारतापेक्षा जास्त आहे, हे विशेष.
