मुंबई : केंद्राने केलेली भाडेवाढ ही मोठय़ा प्रमाणात असल्याची भूमिका मुंबई ग्राहक पंचायतीने घेतली आहे. तसा फॅक्स देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आला असल्याचे पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले. तसेच मासिक पासच्या दरातील वाढ तत्काळ मागे घेतली नाही तर जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही सांगितले.
केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवास भाड्यात दुपटीने वाढ केल्यामुळे लाखो प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यातच भर म्हणून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अफवा आणि रेल्वे मंत्रालयाने निर्माण केलेल्या गोंधळामुळे प्रवाशांच्या गोंधळामध्ये अधिकच भर पडली आहे. भाडेवाढ ही २५ जूनपासून लागू केली जाणार असली तरी सोमवार, २३ जूनपासून पास काढणार्या प्रवाशांकडून नंतर फरक वसूल केला जाणार असल्याचे पत्रक रविवारी जारी केल्याने दिवसभर गोंधळाचे वातावरण पसरले होते. २५ जूनपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच वेळी मुंबई ग्राहक पंचायतीने केंद्र सरकारने दरवाढ मागे घेतली नाही तर जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
