मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) देवनार डम्पिंग ग्राऊंड परिसरातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'मोबाईल लर्निंग स्कूल' अर्थात फिरती शाळा सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनाच्या (१२ जून)निमित्ताने दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या हस्ते या शाळेचे गुरुवारी उद््घाटन करण्यात आले.
मानखुर्द येथील एम-पूर्व वॉर्डमध्ये ७७ टक्के रहिवासी झोपड्यांमध्ये राहतात. यापैकी ९ टक्के मुले शाळेतच जात नाहीत. देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये मुंबईतील बहुतांश कचर्याची विल्हेवाट लावण्यात येते. त्यामुळे या कचर्यातून अनेक टाकाऊ आणि इतर घटक मिळतात. या घटकांपासून रिसायकल केलेले उत्पादन आणि इतर कचरा मिळतो. या कचर्याचे वर्गीकरण करून तो भंगार विक्रेत्यांना विकण्यात येतो. यावरच परिसरातील लोकांचे पोट भरते. त्यामुळे ते आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत.ही बाब लक्षात घेऊन मोबाईल लर्निंग शाळा सुरू करण्यात आली आहे. प्रशिक्षित शिक्षक आणि समुपदेशकांचे मार्गदर्शन मुलांना लाभणार आहे. मोबाईल शैक्षणिक केंद्र म्हणून चालत्या-फिरत्या बसची निवड करण्यात आली आहे.
या बसमध्ये पुस्तके, ग्रंथालय आणि इतर महत्त्वाची शैक्षणिक साधने आहेत. बसचे अंतरंग शाळेच्या वर्गखोल्यासारखे आहे. 'सेव्ह द चिल्ड्रेन' एनजीओ आणि टोचियू कॉर्पोरेशन या जपानमधील संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 'राईड टू स्कूल' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत 'मोबाईल लर्निंग शाळा' अर्थात फिरती शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेच्या माध्यमातून गरीब मुलांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वेळी सेव्ह द चिल्ड्रेनचे महाराष्ट्रातील व्यवस्थापक अशोक पिंगळे, इतोचू इंडियाचे तोशिहिसा फुसे, सेव्ह द चिल्ड्रेनचे इर्विन फर्नांडिस आणि जपान राजदूतावासमधील मुराता शिनाची उपस्थित होते.
