गोराई क्षेपणभूमीवर दुर्गंधी, कचर्‍याचे 'डोंगर' आजही कायम! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोराई क्षेपणभूमीवर दुर्गंधी, कचर्‍याचे 'डोंगर' आजही कायम!

Share This


मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) गोराई क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद केल्याची पाठ मुंबई महानगर पालिका थोपटून घेत असली तरी आजदेखील या भव्य क्षेपणभूमीवरील एका मोठय़ा भागातील कचरा पूर्णपणे हटवलेला नाही. कचर्‍याचा डोंगर पूर्णपणे न हटवल्यामुळे दुर्गंधी आणि वायू प्रदूषण कमालीचे होते. काही वेळेस रहिवाशांना खिडक्या बंद करून घरात कोंडून घ्यावे लागते. या परिसरात 'दैव्य वैष्णवी' हे मोठे गृहसंकुल असून येथील दुर्र्गंधीमुळे रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. कचर्‍याचा वर्षानुवर्षे साठलेला डोंगर मीरा-भाईंदर पलीकडे हलवण्यात येईल, असे आश्‍वासन पालिकेचे स्थानिक विभाग कार्यालय आणि पालिकेचे अभियंते रहिवाशांना बर्‍याच वर्षांपासून देत आहेत; पण आतापर्यंत हा डोंगर जमीनदोस्त झालेला नाही.
येत्या पावसाळ्याच्या आधी हा डोंगर सपाट करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून अलीकडेच रहिवाशांना सांगण्यात आले, मात्र पावसाळा तोंडावर येऊनही कचरा पूर्णपणे हटवलेला नाही. कचरा हटवण्यासाठी पालिकेची छोटी वाहने येतात; पण हे काम गतीने पूर्ण करून स्थानिकांची वायू प्रदूषणातून मुक्तता केली पाहिजे, अशी अपेक्षा येथील स्थानिक नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केली. क्षेपणभूमीतून जैविक वायू तयार करण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू असले तरी ही भव्य क्षेपणभूमी पूर्णपणे कचरामुक्त केव्हा होणार, असा प्रश्न त्यांनी केला आहे. हा कचरा पूर्णपणे हटवण्याच्या मागणीसाठी शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आंदोलन केले होते; पण अद्यापि पालिकेची या कामात कूर्मगती आहे.

दरम्यान गोराई येथील क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पास 'सीटी टू सीटी बार्सिलोना एफएडी-२0१४' हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी बार्सिलोना येथे जाणार असून ८ जुलै रोजी त्याचे वितरण होणार आहे असे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages