घाटकोपरपासून मेट्रो मार्ग वाढवणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपरपासून मेट्रो मार्ग वाढवणार

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)  ठाणे शहरासाठी असणारे मोनो व मेट्रोचे सध्याचे प्रस्ताव व्यवहार्य नसल्याने ते रद्द करून आता घाटकोपर येथील मेट्रो मार्गाला ठाणे ते घोडबंदरपर्यंत नवा मार्ग जोडण्याचा तत्त्वत: निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी विधानसभेत जाहीर केले. सुमारे २२ हजार कोटी रुपये किमतीच्या व ३१ किमी लांबीच्या या मार्गावर घाटकोपर, तीनहात नाका, ओवळा, कासारवडवली या प्रमुख स्थानकांसह २९ स्थानके असतील, अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात अर्थात मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई असा सर्व प्रदेशाचा एकत्रित विचार करून मोठय़ा प्रमाणावर प्रवासी वाहतूक सुविधा निर्माण करण्याची योजना आखण्यासाठी अभ्यास करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
यासंदर्भात शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले की, ठाणे शहरासाठी मेट्रो रेल्वे निर्माण करण्याचा सरकारचा विचार आहे. एमएमआरडीएने याआधी ठाणे-कल्याण-भिवंडी परिसरासाठी मेट्रो व मोनो रेल्वे निर्माण करण्यासाठी मे. राईट्स तसेच कन्सल्टंट इंजिनीयर अशा दोन तज्ज्ञ कंपन्यांकडून स्वतंत्र अभ्यास करून घेतले होते. मात्र हे दोन्ही अहवाल प्रतिकूल आले आहेत. त्यामुळे ठाणे शहरासाठी असणारे मोनो व मेट्रोचे सध्याचे प्रस्ताव व्यवहार्य नाहीत म्हणून सोडून देण्यात येत आहेत. आता घाटकोपर येथील मेट्रो मार्गाला ठाणे ते घोडबंदरपर्यंत नवा मार्ग जोडण्याचा प्रस्ताव पुढे आला असून तो व्यवहार्य असल्याचा अहवाल राईट्स कंपनीने दिला आहे. ३१ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर घाटकोपर, तीनहात नाका, ओवळा, कासारवडवली या प्रमुख स्थानकांसह २९ स्थानके असतील आणि हा प्रकल्प सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा होईल. याबाबत प्राथमिक अहवाल राईट्स या भारत सरकारच्या सल्लागार कंपनीने दिला असून त्यांचा अंतिम अहवाल एका महिन्यात अपेक्षित आहे. त्यानंतर दोन महिन्यांत प्रकल्पाची प्रत्यक्ष घोषणा व पुढची कार्यवाही सुरू करता येईल, असे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages