मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) ऑक्टोबरमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन दिवसांत खांदेपालट निश्चित मानला जात आहे. पृथ्वीराज चव्हाणांऐवजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवले जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. शिंदे हे उपचारासाठी अमेरिकेत असून काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांना तातडीने मायदेशी परतण्यास सांगितल्याने या चर्चेला आणखीच बळकटी मिळाली आहे. चव्हाण यांच्या कार्यशैलीवर काँग्रेस श्रेष्ठी नाराज आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यामुळे नेतृत्व बदलून राज्यातील स्थिती मजबूत करण्याचा -श्रेष्ठींचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर राज्यातील काँग्रेस नेत्यांचीही नाराजी आहे. मुख्यमंत्रिपदासाठी औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही नावाचा श्रेष्ठींकडून विचार शक्य आहे. मुख्यमंत्री बदलला नाही तर विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती श्रेष्ठींना वाटते. शरद पवार यांनीही दिल्लीत ए. के. अँटनी यांची भेट घेऊन राज्यात नेतृत्व बदलाचा आग्रह धरला होता.
