रुग्णालयाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना-मनसेमध्ये जुंपली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रुग्णालयाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना-मनसेमध्ये जुंपली

Share This
मुंबई - भांडुपमध्ये पालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना-मनसेमध्ये आतापासूनच युद्ध सुरू झाले आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असल्याचा दावा महापौरांनी केला होता. त्यानंतर आज मनसेने या भूखंडावर रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम पालिकेला दिला असल्याचे जाहीर केले. शिवसेना-मनसेमध्ये सुरू झालेले युद्ध विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिकच रंगणार असल्याचे चित्र आहे. 
भांडुपमध्ये पालिका 650 खाटांचे सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय उभारणार आहे. त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या होत्या; परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तरीही पुन्हा निविदा मागविण्यात आल्या नाहीत. भांडुपचे मनसेचे आमदार शिशिर शिंदे यांनी हा मुद्दा राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यावर राज्य सरकारमार्फत हे रुग्णालय उभारण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले. राज्य सरकारच्या आश्‍वासनानंतर महापौर सुनील प्रभू यांनी पत्रकार परिषद घेऊन हा केवळ श्रेय लाटण्याचाच प्रकार असल्याचे सांगितले. 

हे रुग्णालय पालिकाच उभारणार आहे. यासाठी शिवसेनेचे प्रयत्नही सुरू आहेत, असे ते म्हणाले. महापौरांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज शिशिर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. रुग्णालय कोणीही उभारा; परंतु ते उभारण्याचा प्रस्ताव मनसेनेच महापालिकेला दिला होता, असे त्यांनी ठणकावून सांगितले. रुग्णालयासाठी गेल्या वर्षी जूनमध्ये आयुक्त सीताराम कुंटे यांनी आपल्यासोबत जागेची पाहणीही केली होती, असा दावा त्यांनी केला. या वेळी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे उपस्थित होते. 

महापौर हतबल, तर राज्य सरकार भिकारी! महापौर हे अभ्यासू नगरसेवक आहेत; पण ते हतबल आहेत, असा टोला शिशिर शिंदे यांनी लगावला. भांडुपचे रुग्णालय उभारण्यासाठी राज्य सरकारकडून निधी मिळवणार का, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता राज्य सरकार भिकारी आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. भांडुपमध्येच नर्सिंग स्कूल आणि डॉक्‍टरांसाठी निवासस्थाने उभारण्यासाठी पालिका आयुक्तांना भूखंड दाखवला आहे. त्याबाबत आयुक्तही अनुकूल आहेत. हा भूखंड महापौरांनाही माहिती नसेल. त्यामुळे भविष्यात हा प्रकल्प आल्यास त्यावर ते दावा सांगू शकणार नाहीत, असे प्रतिउत्तरही शिंदे यांनी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages