मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) रो जच अपघाताचे सत्र सुरु असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग यावा तसेच हे काम वेळेत पुर्ण करण्यात यावे, अशी मागणी करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असणा-या गोवा या राज्याला जोडणारा आणि कोकणच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकर सुरू आहे. मात्र या कामाची गती अत्यंत कमी असल्यामुळे कामाला विलंब होत असून महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. गेल्या सहा वर्षात सुमारे साडे हजार अपघात झाले यामध्ये 1500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 2600 हून अधिकजण जखमी झाले.
या महामार्गाचे पनवेल ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरण सुरू असून त्या कामाला वेग आलेला नाही. अन्य टप्यातील कामांना सुरूवात झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणी राज्य सरकारला निर्देश द्यावे अशी मागणी आमदार अॅड शेलार यांनी केली.
दरम्यान, याबाबत नितीन गडकरी यांनी आपण याबाबत राज्य शासनाची चर्चा करू, कामाला वेग यावा या द्रष्टीने निर्देश देऊ अशी ग्वाही दिली आहे.
