मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) घाटकोपर ते अंधेरी या मार्गावरील सुमारे निम्म्या फेऱ्या बेस्ट मार्फत रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई मेट्रोकडेच मोठ्या प्रमाणावर प्रवासी वळल्यामुळेच बेस्टला या मार्गावरील एकट्या 340 क्रमांच्या बससाठी दैनंदिन 292 फेऱ्यांमध्ये कपात करत ही संख्या आता 150 इतकी खाली आणण्याची वेळ आली आहे. प्रवासी मोठ्या प्रमाणावर बेस्टकडून दुरावल्यामुळेच मेट्रो स्थानकानिहाय वसाहतींना जोडणाऱ्या नव्या मार्गांसाठीची चाचपणी आता बेस्ट उपक्रमाने सुरू केली आहे.
चकाला, मरोळ नाका, आझाद नगर, एअरपोर्ट रोड यासारख्या मेट्रो स्थानकांपासून एमआयडीसी अंधेरी, लोखंडवाला, लिंक रोड यासारख्या नवीन मार्गाची सुरुवात करण्याचा बेस्टचा मानस आहे. मेट्रो स्थानकाच्या नजीकचे परिसर बेस्टच्या नवीन मार्गासाठी हेरण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी चार ते सहा नवीन बसगाड्यांची आवश्यकता भासेल, अशी माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली. येत्या 1 जुलैपासून ही फीडर रूट सेवा सुरू करण्याचा बेस्टचा मानस असून गरज पडल्यास लवकर या मार्गावर बसेस सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.
घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोने बेस्टच्या एकूण महसुलातील 18 टक्के उत्पन्नाला कात्री लावली आहे. दहा हजार दैनंदिन प्रवाशांवरही बेस्टला पाणी सोडावे लागले आहे. बेस्टच्या मार्ग क्रमांक 340 घाटकोपर अंधेरी, मार्ग क्रमांक 249 यारी रोड ते अंधेरी, मार्ग क्रमांक 251 वर्सोवा ते अंधेरी, मार्ग क्रमांक 332 कुर्ला ते साकीनाका, मार्ग क्रमांक 334 सीप्झ ते घाटकोपर या मार्गावरील बेस्टचे प्रवासी सध्या मेट्रोच्या पर्यायाकडे वळले आहेत.
बेस्टच स्वस्त
बेस्टच्या घाटकोपर अंधेरी प्रवासासाठी सध्या 15 रुपये मोजावे लागतात. मेट्रोचे नवीन दर लागू झाल्यास मेट्रोच्या याच प्रवासाच्या एका फेरीसाठी किमान 30 रुपये मोजावे लागतील, असे बोलले जाते. त्यामुळे मेट्रोला एका फेरीला मोजाव्या लागणाऱ्या पैशांच्या तुलनेत बेस्टचा रिटर्न प्रवास शक्य असेल, अशी चर्चा सध्या उपक्रमात सुरू आहे. त्यामुळे तिकीटाची तुलना पाहता बेस्टला प्राथमिक पसंतीचा पर्याय असण्याची शक्यता आहे.
