भंगार, कचरा झाडांच्या फांद्यांच्या ज्वलनातून प्रदूषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2014

भंगार, कचरा झाडांच्या फांद्यांच्या ज्वलनातून प्रदूषण

मुंबई : महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पावसाच्या प्रारंभी रस्त्यांवर ठिकठिकाणी झाडांच्या तोडलेल्या फांद्या व कचरा साठलेला आहे.भंगारासह कचरा आणि फांद्या जाळल्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याला पालिका प्रशासनातील अधिकारी जबाबदार आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी शिवसेना, भाजपा आणि मनसेच्या नगरसेवकांनी पालिका सभागृहात महापौरांकडे केल्या. 
शिवसेनेच्या नगरसेविका पूजा महाडेश्‍वर यांनी ६६-ब अन्वये कचरामिश्रीत झाडांच्या फांद्या, भंगार जाळणे त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रदूषणाचा होणारा त्रास, धोक्यात आलेले पर्यावरण आदी विषयांवर पालिका सभागृहात चर्चा घडवून आणली. त्याला दोषी असणारे कंत्राटदार आणि पालिका अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे झाडांच्या फांद्या, कचरा आणि भंगार साचते व ते जाळले जाते, मात्र याविषयी तक्रारी करूनही अधिकारी कारवाई करत नाहीत, अशी तक्रार नगरसेविका ज्योती अळवणी यांनी केली. 

मनसेचे चेतन कदम यांनी कंत्राटदार कचरा आणि फांद्या उचलत नसल्याचे सांगून प्रत्येक विभागात यासाठी स्वतंत्र गाडी देण्याची मागणीही त्यांनी केली. कचरा, भंगार आणि फांद्या जाळल्यामुळे नागरिकांना श्‍वसन, स्मरणशक्ती जाणे, कर्करोग आदी जीवघेणे रोग होत असून, पालिकेचा पर्यावरण विभाग सुस्त असल्याचा आरोप माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी केला. तर दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या राजेश्री शिरवाडकर यांनी केली. पालिका प्रशासनाने पर्यावरणबाबत माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी केली. या चर्चेत शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, भाजपाच्या मनीषा चौधरी, मनसेचे प्रकाश दरेकर यांनी भाग घेतला. चर्चेला उत्तर देताना महापौर सुनील प्रभू म्हणाले, कचरा, फांद्या व भंगार जाळण्याच्या घटना प्रशासनाने त्वरित रोखण्याचे आदेश दिले. अतिरिक्त गाड्या लावून कचरा २४ तासांत उचलावा, असे आदेश त्यांनी दिले. झाडे व फांद्या उचलण्यासाठी माणसे आणि गाड्या नाहीत, असा आभास निर्माण करून लोकांमध्ये उद्रेक निर्माण करायचा आणि ही कामे करण्यासाठी कंत्राटदार व अधिकारी पैसे खातात, असा आरोप महापौरांनी केला. 

कचरा आणि फांद्या उचलण्यासाठी प्रत्येक विभागात दोन-दोन ट्रक, चार-चार कामगार दिले आहेत. कामांचा पाठपुरावा केला जातो. येत्या २४ तासांत सर्व कचरा हटवू, असे आश्‍वासन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस.व्ही. आर श्रीनिवास यांनी या वेळी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS