दिल्ली झुकली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2014

दिल्ली झुकली


Railway

कोणतीही नवी सुविधा नाही, प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचीही माणुसकी नाही, जीव गुदमरणाऱ्या लोकलप्रवासाला नवा पर्यायही नाही...आणि तरीही तब्बल २२५ टक्के तिकीट दरवाढ. रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गोरगरिबांचे मासिक अर्थकारण बिघडवणारा लोकल दरवाढीचा निर्णय अखेर केंद्र सरकारने मागे घेतला. 'अच्छे दिन'चे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई-ठाणेकरांच्या संतापाची धग अखेर दिल्लीच्या रेल्वे मंत्रालयाला जाणवली व मंगळवारी ही अन्याय्य वाढ निदान सुसह्य झाली. यामुळे ८० किमीपर्यंतच्या प्रवासासाठीचे तिकीटदर जैसे थेच राहतील. फर्स्ट आ​णि सेकंड क्लासच्या पाससाठी आता सरसकट १४.२ टक्के जादा पैसे मोजावे लागतील. पासची ही वाढ २८ जून रोजी अंमलात येणार आहे. तर, मेल/एक्स्प्रेसची यापूर्वी जाहीर झालेली भाडेवाढ बुधवारपासून अमलात येणार आहे.
केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात रेल्वे भाड्यात मोठी वाढ करून मुंबईकरांना धक्का दिला होता. तिकीट आणि पास दरांत दुपटीने वाढ करण्याच्या निर्णयाने उपनगरीय प्रवाशांमध्ये संताप उफाळला होता. या विरोधाला काँग्रेसने हवा दिली होती, तर एनडीएचा घटकपक्ष शिवसेनेनेही प्रखर विरोध दर्शवला होता. मात्र मुंबई हायकोर्टाने रेल्वेला दरवाढ करण्याचा अधिकार असल्याचे सांगितल्याने सर्व मार्गच खुंटलेले. सुरुवातीला सरकारच्या बचावाच्या पवित्र्यात असलेल्या भाजपला नंतर मात्र प्रवाशांच्याच बाजूने उभे राहावे लागले होते. केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली किरीट सोमय्या, गजानन कीर्तीकर, रामदास आठवले, पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, अरविंद सावंत, राजन विचारे, राहुल शेवाळे, कपिल पाटील आणि आशिष शेलार यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन रेल्वेच्या प्रवासी भाडेवाढीमुळे मुंबईकरांवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले. प्रवासी भाड्यात १४.२ टक्क्यांची वाढ करताना मुंबईकरांच्या मासिक पासच्या दरात २२५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, याची जाणीव रेल्वेमंत्र्यांना शिष्टमंडळाने करून दिली. गेल्या तीन दिवसांपासून पूर्वीच्या दराने मासिक पास काढून भाडेवाढ टाळण्यासाठी दीड-दोन लाख प्रवाशी रांगा लावून उभे असल्याची माहिती गौडा यांना देण्यात आली. त्यानंतरच भाडेवाढ मागे घेण्याची सूत्रे हलू लागली व रात्री नवी सुसह्य भाडेवाढ जारी झाली.

नव्या निर्णयानुसार ८० किमीपर्यंतच्या उपनगरीय प्रवासात सेकंड क्लासच्या ​तिकिटांसाठी कोणतीही वाढ केलेली नाही. तर, फर्स्ट आणि सेकंड क्लासच्या पासमध्ये सरसकट १४.२ टक्के वाढ झाली आहे. यामध्ये इंधन समायोजन आकार समाविष्ट करण्यात आला आहे. ही नवीन भाडेवाढ २८ जूनपासून लागू होणार असून मेल/एक्स्प्रेस तिकिटांची वाढ पूर्वीप्रमाणेच आज, २५ जूनपासून अंमलात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS