पालिका आयुक्तांवर सफाई आयोग कारवाही करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 June 2014

पालिका आयुक्तांवर सफाई आयोग कारवाही करणार

बेजबाबदार कंत्राटदारांना आता पाच वर्षे सक्तमजुरी
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांना भेटण्यास पालिका आयुक्त सीताराम कुंटे टाळाटाळ करत असल्याने आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयोगाच्या सदस्या डॉ. लता ओमप्रकाश महंतो यांनी दिला आहे. पालिका आयुक्त आम्हाला सुद्धा सफाई कर्मचाऱ्यासारखी वागणूक देत आहे यामुळे आयोग आयुक्तांवर नाराज असून आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस देणार आहे. 
सफाई कर्मचाऱ्यांचा कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास अशा बेजबाबदार कंत्राटदाराला पाच वर्षे सक्तमजुरी आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात येईल. यापुढे पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही जबाबदारी झटकल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही सफाई कर्मचारी आयोगाने स्पष्ट केले आहे.

मागील तीन महिन्यांत सफाई कामगारांचा मॅनहोलमध्ये मृत्यू झाल्याच्या खळबळजनक घटना घडल्या आहेत; मात्र पालिका प्रशासन त्याबाबत गंभीर नाही. सफाई कामगार आयोगाच्या सदस्य लता माहंतो यांनी गेल्या महिन्यात कामगारांच्या वस्त्यांना; तसेच कामाच्या ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला होता. त्याबाबत सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. आज (ता. 25) पुन्हा त्यांनी सफाई कामगारांना पुरवण्यात येणाऱ्या सोई-सुविधांचा आढावा घेतला; तसेच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील देशमुख यांची भेट घेतली.

27 डिसेंबर 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सफाई कामगारांसंदर्भात काढलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या. मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन लाखाचे धनादेश कंत्राटदाराने दिल्याची माहिती त्यांनी दिली. यापुढे मलनिःसारण वाहिन्यांमध्ये कामगारांना पाठवण्यापूर्वी त्यांना सुविधा आणि साधने द्यावीत. कामगाराचा मृत्यू झाल्यास कंत्राटदाराला जबाबदार धरण्यात येईल, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले. पालिका कर्मचार्यांना माहूल येथे पाठवू नये, कर्मचारी राहत असलेल्या ठिकाणीच संक्रमण शिबीर बांधून त्यांचे पुनर्वसन करावे, कंत्राटी कामगारांना पालिकेच्या सेवेत  घ्यावे, सफाई कर्मचाऱ्यांची भारती सुरु करावी, लाड पागे समितीची १२ ऑगस्ट १९७५ पासून अंमलबजावणी करावी, १३ हजार वारसांना अद्याप नोकरी मिळालेली नाही त्यांना नोकरी द्यावी इत्यादी आदेश महंतो यांनी दिले आहे. 
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS