वरळी : कामगारांचे प्रलंबित प्रश्न, दूध योजनेस होणारा अपुरा पुरवठा, डेअरीची दैनावस्था, दुधाची पावडर, बटरच्या साठय़ाची कमतरता आणि इतर समस्यांमुळे त्रस्त झालेल्या वरळी येथील दुग्धशाळा कामगार संघटनेतील कर्मचार्यांनी बुधवारी दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
दुष्काळामुळे दूध उत्पादनावर झालेला परिणाम, जगभरात दूध भुकटीची वाढलेली मागणी आणि भुकटी तयार करण्यासाठी दररोज वापरण्यात येणारे २५ लाख लिटर दूध यामुळे दुधाचा पुरवठा घटला आहे. राज्यात खाजगी दूध संघ व डेअर्यांना परवागनी देताना १0 टक्के लेव्ही म्हणून शासनास दूध द्यावे, अशी सक्ती करण्यात आली होती, मात्र राजकारण्यांच्या हातात असलेल्या या खाजगी दूध संघ व डेअर्या या नियमाचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे शासनमान्य दूध डेअरीला होणार्या दुधाच्या पुरवठय़ात कपात झाली आहे.
वरळी येथील डेअरी ऐन मोक्याच्या जागी असून, ती बंद करून भव्य गृहसंकुल उभारण्याचा मानस काही राजकारण्यांचा असल्याचा आरोप दुग्धशाळा कामगार संघटनेने केला. राज्य सरकार खाजगी डेअर्यांना भरघोस अनुदान देते, मात्र शासकीय दूध योजनांना वाढीव भावाने दूध देऊनही कमी दरात दूध विक्री करण्याचा आग्रह धरत आहे. यामुळे शासकीय दूध योजना तोट्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे
