मुंबई - केईएम रुग्णालयात दाखल केलेल्या माणसाला औषधे मिळत नाहीत. उपचारात दिरंगाई होत असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या रुग्णालयाला वर्षभरापासून अधिष्ठाता नाही. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचा कारभार अंधाधुंधी पद्धतीने चालत असल्याबद्दल पालिका सभागृहात आज जोरदार आक्षेप घेण्यात आले.
पालिकेचे हे रुग्णालय आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. सुमारे 1800 खाटांचे हे रुग्णालय आहे. पालिका रुग्णालयावर अडीच हजार कोटी रुपये खर्च करते. एवढा खर्च करूनही रुग्णालयाचा कारभार सुधारत नाही. या रुग्णालयाला गेल्या वर्षभरापासून अधिष्ठाता नाही. परिणामी या रुग्णालयाची व्यवस्था कोलमडली आहे. समाजवादी पक्षाचे सदस्य अशरफ आझमी यांनी याबाबत 66 ब अन्वये गंभीर मुद्दा उपस्थित केला. रुग्णालयातील कारभारामुळेच रुग्णांचे, पोलिसांचे; तसेच डॉक्टरांचे मृत्यू ओढवत आहेत. ही गंभीर बाब आहे. त्याला प्रशासनाचा उदासीन कारभार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. यकृत प्रत्यारोपण कक्षाची दुर्दशा झाली आहे. डोळ्यांचा कक्ष; तसेच रक्त तपासणी करण्याची लॅब अडगळीत आहे. शवागृहाची दुर्दशा झाली आहे. रुग्णालयावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना एक्सरे, सोनोग्राफी; तसेच औषधांसाठी रुग्णालयाबाहेर पाठविले जात आहे. गरीब रुग्णांना नाडले जात आहे. हा प्रकार थांबवून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी आझमी यांनी केली.
विविध पक्षांच्या नगरसेवकांनी आपापल्या विभागातील रुग्णालयांमध्ये अपुऱ्या सुविधांचे प्रश्न मांडले. आरोग्याचा प्रश्न आज सदस्यांनी चांगलाच लावून धरला. याबाबत ठोस उपाययोजना करू, अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.
