रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आंबेडकरी चळवळीमधील सर्वात प्रबळ असा गट आहे. सध्या आठवले गटामध्ये विविध क्षेत्रातील नामाकिंत व्यक्तींचा प्रवेश घेण्याचा सपाटा सुरु आहे. विविध क्षेत्रातील नामाकिंत व्यक्तीं आठवले गटामध्ये प्रवेश घेत असल्याने आठवले गट फॉर्मात असल्याचे चित्र दिसत असले तरी हा प्रकार म्हणजे आंबेडकरी चळवळ उध्वस्त करण्याचे षडयंत्र आहे. आंबेडकरी जनतेने हे षडयंत्र वेळीच ओळखले पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रकार होऊ शकतो.
२०१२ मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा महायुती सोबत असलेल्या आठवले गटाला २९ जागा देण्यात आल्या होत्या. या जागांवर पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात यायचे सोडून बाहेरून आलेल्यांना तिकिटे देण्यात आली. हातावर मोजता येतील अश्या जागांवर फक्त कार्यकर्त्यांना साधी देण्यात आली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. ही नाराजी कार्यकत्यांनी पत्रकारांकडे बोलून दाखवली होती. या नाराजीचा परिणाम म्हणून आणि शिवसेना, भाजपाची मते आठवले गटाच्या उमेदवारांना मिळाली नसल्याने आठवले गटाचे २८ उमेदवारांचा पराभव झाला आहे. जिंकून आलेले एक मात्र नगरसेवक साब्बारेड्डी बोरा हे स्वताच्या हिमतीवर जिंकले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आठवले गटाला एकच सातार्याची जागा देण्यात आली होती. या जागेवर आपला उमेदवार पडणार तरीही या जागेचा स्वीकार करण्यात आली. साताऱ्याची जागा लढवणाऱ्या उमेदवाराला मारहाण झाल्याने मी निवडणूक लढवणार नाही असे सांगितल्याने आठवले गटाला त्या ठिकाणी दुसरा उमेदवार द्यावा लागला होता. आठवले महायुतीचा जप करत असताना आणि मोदी नावाची लहर असताना आठवलेंच्या एकमेव उमेदवाराला हार पत्करावी लागली आहे. आठवले नेहमी सांगतात कि आमच्या मतामुळे महायुतीचे उमेदवार जिंकत आहेत मग महायुतीचे नेते आपली मते आठवले गटाच्या उमेदवारांना द्यायला का तयार नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रिपाई आठवले गटामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांचा सपाटा लागला आहे. प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये आठवले आमचा पक्ष बाबासाहेबांच्या ६० टक्के दलित आणि ४० टक्के दलितेत्तर या तत्वावर चालला आहे असे सांगत असतात. मग या तत्वावर तिकिटाचे वाटप सुद्धा व्हायला नको का ? नुकताच आठवले यांच्या गटामध्ये भारतीय स्पायडरमन गौरव शर्मा व सिनेकलावंत रॉनी विलियम्स यांनी प्रवेश केला. महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी ज्या जागा मिळतील त्यामधील फक्त आरक्षित असलेल्या जागांवरच पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल इतर जागांवर बाहेरून आलेल्या लोकांना संधी दिली जाईल असे आठवले यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये संधी मिळणार नाही हे स्पष्ट आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रसिद्ध चेहरे आठवले गटाला मते मिळवून देतील असा समज आठवले व त्यांच्या जवळच्यांनी केलेला दिसत आहे. याप्रकारामुळे पक्षामध्ये केत्तेक वर्षे काम करणारे, आंदोलने करणारे, पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाणारे, शिव्या खाणारे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. आठवले साहेबांनी नवीन लोकांना प्रवेश द्यायचा, त्यांच्या पुढ्यात फुटबॉलचा बॉल ठेवायचा, हा बॉल नवीन लोकांनी लाथेने उडवायचा आणि गोल झाला नाही तर हा बॉल आम्ही आणून पुन्हा आठवले साहेबांच्या पायाजवळ ठेवायचा अशी परिस्थिती सध्या कार्यकर्त्यांची झाली आहे असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.
आठवले गटातील कार्यकर्ते किती नाराज आहेत याची प्रचीती यावरुन येते. तरीही पक्षाध्यक्ष रामदास आठवले व त्यांच्या जवळच्यांना हे प्रकार दिसत नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महायुतीने आठवलेंना दोन वर्षे तात्कळत ठेवले आणि आता खासदारकी दिली असेच आठवले गटातील एखाद दुसऱ्याला विधान परिषदेची आमदारकी मिळेल पण याने प्रश्न सुटणार आहे का ? महायुतीच्या उमेदवारांना आमची मते दिल्याने महायुतीचे उमेदवार जिंकले असे म्हणणारे आठवले महायुतीमधील पक्षाची मते आपल्याकडे वळवण्यात अपयशी का ठरत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी प्रमाणे शिवसेना भाजपा त्यांचा वापर करून घेत आहे हे त्यांना का कळत नाही ? कि हे सत्य आठवले आणि त्यांचा गट स्वीकारण्यास तयार नाहीत ?
रिपाई आठवले गट हा आंबेडकरी चळवळीमधील सर्वात ताकदवान गट होता. सध्या हा गट महायुतीच्या, हिदुत्ववादी विचारसरणीच्या दावणीला बांधला गेला आहे. आठवले गटामध्ये प्रसिद्ध व्यक्तींना प्रवेश देवून त्यांना निवडणुकीमध्ये जिंकवून देण्याचा प्रतन सुद्धा केला जाईल. पण यामुळे आमेद्कारी कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मोठे नुकसान होणार आहे. जिथे आंबेडकरी कार्यकर्ते नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री व्हायला हवेत त्या ऐवजी भलतेच लोक या पादावर जाणार आहेत. हि आंबेडकरी चळवळीला मारक अशी बाब आहे. आंबेडकरी चळवळ संपली असे कित्तेक जाते चर्चिले जाते. आता तर उरली सुरली चळवळ सुद्धा आठवले गटाला हाताशी धरून संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. तरी आंबेडकरी जनतेने या प्रकारची वेळीच दखल घेवून आंबेडकरी चळवळ वाचवण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:
Post a Comment