कॅम्पा कोलावर आज कडेकोट बंदोबस्तात कारवाई? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॅम्पा कोलावर आज कडेकोट बंदोबस्तात कारवाई?

Share This
मुंबई - विनंती, आवाहन आणि विनवण्या करूनही कॅम्पा कोलातील रहिवासी महापालिकेला दाद देत नसल्याने थेट कारवाई करण्याचा पालिकेचा विचार आहे. कॅम्पा कोलातील बेकायदा घरांवर कारवाई करण्याची योजना तयार करण्यासाठी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस विभागाची महत्त्वाची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शनिवारी (ता. 21) कडेकोट पोलिस बंदोबस्तात कारवाई होण्याची शक्‍यता आहे.
कॅम्पा कोलातील बेकायदा घरे रिकामी करण्याची मुदत संपल्यानंतर बेकायदा घरांची वीज व गॅस जोडणी कापण्यासाठी शुक्रवारी पालिकेचे पथक कॅम्पा कोला संकुलाबाहेर पोहोचले; मात्र रहिवाशांनी संकुलाचे प्रवेशद्वारच बंद करून ठेवले. पालिकेच्या पथकाचे प्रमुख उपायुक्त आनंद वाघराळकर यांनी कारवाईसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले; मात्र रहिवाशांनी प्रवेशद्वार उघडण्यास नकार दिला. दुपारी तासभर पालिकेचे पथक प्रवेशद्वारासमोर उभे होते; मात्र रहिवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पथक हात हलवत परतले. दुपारी चारच्या सुमारास पालिकेचे पथक पुन्हा या परिसरात दाखल झाले. पथकाने रहिवाशांच्या प्रतिनिधींना बाहेर बोलून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रहिवाशांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन या प्रतिनिधींनी पथकाला दिले; मात्र रहिवाशांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने आजची कारवाई स्थगित केली.

बेकायदा घरे रिकामी करण्यासाठी पालिकेने अनेकदा मुदतवाढ दिली. गेल्या वेळी कॅम्पा कोलातील बेकायदा घरांवर थेट कारवाई सुरू केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे आता खबरदारीने पावले टाकली जात आहेत. कारवाईची दिशा ठरवण्यासाठी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. उद्या ही कारवाई होणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कॅम्पा कोलातील वीज आणि गॅस जोडण्या कापण्याची आजची कारवाई शांततामय मार्गाने करण्यात येणार होती. त्यानुसार पालिकेने रहिवाशांना आवाहनही केले; मात्र रहिवाशांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कारवाईबाबत पोलिस आणि पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. बेकायदा घरांवर कारवाई होणारच आहे.
- आनंद वाघराळकर, उपायुक्‍त, महानगरपालिका


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages