कॅम्पाकोलातील रहिवाश्यांविरोधात गुन्हा दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॅम्पाकोलातील रहिवाश्यांविरोधात गुन्हा दाखल

Share This
मुंबई - कॅम्पाकोलातील बेकायदा घरांवर शुक्रवारी कारवाई करताना अडथळा आणणाऱ्या रहिवाशांविरुद्ध कलम 143 (बेकायदा जमाव) कलम 353 (सरकारी कामात अडथळा)नुसार वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजही (शनिवार) कॅम्पाकोलावर होणारी कारवाई टाळण्यात आली आहे. त्यामुळे कॅम्पाकोलाचा तिढा कायम असून, पोलिस व पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
विनंती, विनवण्या, आवाहन करूनही कॅम्पाकोलातील रहिवासी दाद देत नसल्याने महापालिकेने कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या शुक्रवारच्या कारवाईला अडथळा आणणाऱ्या रहिवाशांवर वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पालिका शनिवारी कॅम्पाकोलावर पोलिस संरक्षणात कारवाई करण्याची शक्‍यता होती. पण, ही कारवाई टाळण्यात आली आहे.

पालिकेने कॅम्पाकोलातील बेकायदा घरे रिकामी करण्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी संपली. बेकायदा घरांची वीज आणि गॅस जोडणी तोडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी गेले होते. मात्र, रहिवाशांनी लोकप्रतिनिधींच्या मदतीने ही कारवाई रोखून धरली. पालिका उपायुक्त आनंद वाघराळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रहिवाशांना आणि लोकप्रतिनिधींना कारवाईसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. दुपारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक तास चर्चा करूनही रहिवाशांनी प्रतिसाद दिला नाही. संध्याकाळी पुन्हा रहिवाशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांना कारवाईसाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले. मात्र, रहिवाशांनी असहकार कायम ठेवला. 

अनेकदा मुदतवाढ देऊनही रहिवासी सहकार्य करत नसल्याने पालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने केलेल्या व्हिडिओ शूटिंगच्या आधारे, कारवाईत अडथळा आणणाऱ्या रहिवाशांवर संध्याकाळी उशिरा वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलिस कुमक मिळण्यासाठी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. पालिकेची कारवाई उद्याही होणार असून उपलब्ध पोलिस संरक्षणात कशा प्रकारे कारवाई करावी, याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे अतिरिक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages