मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात दलित आणि आदिवासी समाजावर होणारे वाढते अत्याचार थांबविण्याच्या मागणीसाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विधान भवनात भेट घेतली. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दलित ऍ़ट्रोसिटीच्या गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सदर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दलित ऍ़ट्रोसिटीच्या केसचा तातडीने निकाल लागण्याकरिता विशेष जलदगती न्यायालयाची निर्मिती करुन सदर खटले चालवावे, अशी मागणी तावडे आणि आठवले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत केली.
नितीन आगे, सुनिल गायकवाड, कोल्हापूर जिल्ह्यातील दलित वस्तीवर झालेला हल्ला, सोनई हत्याकांड, खैरलांजी हत्याकांड असे अनेक गंभीर गुन्हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कारर्किदीत झाले. गेल्या काही महिन्यांमध्ये दलितांविरुध्द झालेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील मोठ्याप्रमाणात वाढ झालेली आहे. यासंदर्भात सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली

