मुंबई / मुकेश धावडे / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबई शांघाय बनविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस पावले उचलली आणि मुंबईत विविध प्रकल्पांची उभारणी केली. मात्र या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या कंत्राटदारांनी योग्य दर्जाचे काम केले आहे की नाही. हे पाहण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नसल्याने मुंबईकरांवर जीवित, आर्थिक हानी होण्याच्या घटना बऱ्याचदा घडतात. यावर योग्य कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येत असल्यानेच नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपूल असो की फ्लायओव्ह सर्वत्र हेच चित्र… मग याला वडाळा-शिवडी पूर्व दरम्यान उभारण्यात आलेला सीएसटी-चेंबूर फ्लायओव्हर अपवाद कसा ठरू शकेल. वर्षभरातच सीएसटी - चेंबूर फ्लायओव्हर उभारण्यासाठी लावण्यात आलेले गर्डरची दुरवस्था होत चालली असल्याने येथून प्रवास करणारे वाहनचालक हा फ्लायओव्हर केव्हाही कोसळू शकतो व मोठा अपघात भविष्यात घडू शकतो अशी भीती व्यक्त करीत आहेत.
मुंबईचे शांघाय करू...मुंबईचे लंडन, मुंबईचे सिंगापूर करू! मुंबईचे मुंबई सोडून काहीही करू, मात्र करणार नाही ते नियोजन. आथिर्क राजधानी असलेल्या मुंबईला जागतिक वित्तीय केंद बनवण्याची पॉवर पॉइंट प्रेंझेंटेशनमधली भाषा ऐकून मुंबईकर विटला आहे. लाखो कोटी रुपयांचा महसूल देणा-या मुंबईच्या वाट्याला त्यापैकी अल्पस्वल्प निधी येतो. मग केंदाने कशी तोंडाला पाने पुसली याचीच चर्चा करत पुढच्या बजेटची वेळ येते. कधीतरी पंतप्रधानांना विमानतळावरच गाठून मुंबईच्या प्रेंझेंटेशनची झलक दाखवली जाते आणि पायाभूत प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्पांचा दर्जा द्या म्हणून साकडे घातले जाते. निवडणुका येतात. आश्वासनांच्या फैरी झडतात. नियोजनाच्या गप्पा होतात. निवडणुकांचा हंगाम संपला की मात्र सारेच सारे काही विसरतात. हे प्रत्यकाने अनुभवले असेलच… पदपथांपासून फ्लायओव्हर पर्यंत आणि घरापासून रेल्वेपर्यंत पावलोपावली संकटांचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांचे जीवन सुखकर करण्यासाठी कोट्यवधींचे विविध पायाभूत प्रकल्प दणकेबाज घोषणांत सुरू करण्यात आले. परंतु त्यासाठी वापरण्यात येणारी साधन सामुग्री ही नेमकी कोणत्या दर्जाची आहे याची दक्षता न घेण्यात आल्याने आजमितीस तयार करण्यात आलेले प्रकल्प वर्षभरातच ढासळू लागले असल्याने सर्वसामान्य माणसाचे जगणे अधिक दयनीय झाले आहे.
वडाळा पूर्व बीपीटी कंटेनर रोड वरून एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सीएसटी -चेंबूर फ्लायओव्हर वरून अवघ्या वीस मिनिटात प्रवास करता येतो. ऐरवी हे अंतर प्रवाशांना कापण्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागायचा मात्र अवघ्या वीस मिनिटात हे अंतर कापण्यात येत असल्याने येथून ये -जा करणाऱ्या वाहनचालक प्रवाशांची संख्या वाढली आहे. परंतु प्रवाशांच्या सुखसोयी व वाहतूक कोंडीला तोडगा म्हणून उभारण्यात आलेला हा फ्लायओव्हरची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली असून या फ्लायओव्हरसाठी लावण्यात आलेले गर्डर ढासळू लागले आहेत. यामुळे येथे भविष्यात मोठी दुर्घटना होऊन जीवित किंवा वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे फ्लायओव्हरच्या खालील रस्त्यावरून म्हणजेच बीपीटी कंटेनर रोड वरून प्रवास करणारा वाहनचालक स्वप्नील राऊत यांचे म्हणणे आहे.
बीपीटी कंटेनर रोड हा वडाळा ते सीएसटी दरम्यान येतो त्यामुळे या मार्गालगत बीपीटी कामगार वसाहत, इंडियन ऑईल कंपन्या, हॉस्पिटल अशी लोकवस्ती आहे. अशा या मार्गावर उभारण्यात आलेला फ्लायओव्हर अतिशय सोयीस्कर आहे. मात्र वर्षभरातच ढासळत चाललेल्या या फ्लायओव्हरच्या दुरुस्तीसाठी बऱ्याचदा बीपीटी कंटेनर रोड एमएमआरडीएचे कर्मचारी बंद करतात. त्यामुळे दु मार्गी असलेला हा रस्ता एक मार्गी होतो. सतत वाहनांच्या गर्दीमुळे येथे अपघात होतातच विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाच चुकत असल्याने सर्वाधिक अपघात होतात. असे येथील नागरिकांचे म्हणणे असून या फ्लायओव्हरची उभारणी करून शासनाने योग्य काम केले आहे. पण या कामाचे योग्य नियोजन न केल्याने येथे निष्कृष्ठ दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे.
फ्लायओव्हरच्या उभारणीसाठी लावण्यात आलेले गर्डर खचत चालले असून त्यातून रस्त्यावर दगड माती पडत असल्याने गर्डरमध्ये पोकळी (ग्याप) निर्माण होऊ लागली आहे. यावर तक्रारी दिल्यानंतर एमएमआरडीएचे कर्मचारी येउन अधून-मधून मलमपट्टी करून जातात. पण काहीच दिवसात पुन्हा तीच परीस्थित निर्माण झालेली असते. त्यात पावसाळा जवळ आल्यामुळे हा फ्लायओव्हर केव्हाही जीवावर बेतू शकतो. हे लक्षात घेऊन एमएमआरडीने तात्काळ कायमचे नियोजन करावे अशी समाजसेवक विजयराव भुजबळ यांची मागणी आहे. याबाबत एमएमआरडीए मुख्य जनसंपर्क अधिकारी दिलीप कवठकर यांच्याशी चर्चा केली असता या कामा संबंधित अभियंत्यांशी तात्काळ चर्चा करून कामाचे योग्य नियोजन करण्यात येईल असे कवठकर यांनी सांगितले

