मुंबई / मुकेश धावडे / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) पावसाळ्यात वादळ-वाऱ्यांमुळे विविध ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडतात व त्यामुळे जीवित हानी किंवा वित्त हानी होते. यावर उपाय म्हणून पालिका पावसाआधी धोकादायक झाडांची पाहणी करून छाटणी करते. मात्र वडाळा पूर्व येथील बीपीटी वसाहतीतील झाडांची पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप बीपीटी कर्मचाऱ्यांकडून छाटणी करण्यात न आल्याने येथील झाडे पावसापूर्वीच कोलमडू लागली आहेत. वेळेतच या झाडांची छाटणी करण्यात आली नाही तर पावसळ्यात झाडे कोसळण्याची भीती येथील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
वडाळा पूर्व बीपीटी वसाहतीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारची झाडे आहेत. ही झाडे साधारण 40 ते 45 वर्षे जुनी असून रहदारीच्या मार्गालगतच असल्याने या झाडांचा धोका नेहमीच येथील नागरिकांना वाटतो. मात्र या धोक्याची घंटा पावसळ्यात निश्चित वाजणार याची खात्रीही नागरिकांना आहे. दरवर्षी पावसाआधी येथील धोकादायक अथवा रस्त्याला, वाहनांना, नागरिकांना अडथळा निर्माण होणाऱ्या झाडांची छाटणी करण्यात येते परंतू यंदा पावसाळा तोंडावर आला तरी झाडांची छाटणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसात जिवित किंवा वित्त हानी होण्याची भीती येथील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत असून गेल्या एक आठवड्यांपासून वडाळा पूर्व स्थानकालगत असलेल्या रहदारीच्या मार्गावर झाड कोसळून पडले आहे. परिणामी वाहने व तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पण हे झाड मार्गातून मोकळे करण्यासाठी बीपीटी प्रशासन कोणतीही भूमिका बजावण्यास तयार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वसाहतीत एरवीही झाडे कोलमडून पडतात तर पावसळ्यात ती अधिक प्रमाणात कोलमडून पडू शकतात. त्यामुळे या झाडांची बीपीटी कर्मचाऱ्यांनी वेळेतच पाहणी करून झाडाची छाटणी करावी अशी मागणी येथील नागरिकांमध्ये जोर धरू लागली असून गेल्या एक आठवड्यांपासून रेल्वे स्थानकालगत असलेल्या रहदारीच्या मार्गात कोलमडून पडलेले झाड मार्गातून लवकरात लवकर मोकळे करावे. अशीही मागणी येथील नागरिक करीत आहेत. याबाबत वडाळा बीपीटी वसाहत निरीक्षक हरीश जाधव यांच्याशी चर्चा केली असता धोकादायक झाडा विषयी महानगर पालिकेच्या संबंधीत अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे तरीही याबाबत संबंधीत अधिकाऱ्याशी चर्चा करून हा प्रश्न पावसाळ्यापूर्वी सोडविण्यात येईल असे जाधव यांनी सांगितले असून रस्त्याच्या कडेला कोलमडून पडलेले झाड येत्या दोन दिवसात रस्त्यातून हटवण्यात येईल असेही जाधव यांनी सांगितले.
