कॅम्पा कोलामधील रहिवाशांचे पालिकेला आव्हान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कॅम्पा कोलामधील रहिवाशांचे पालिकेला आव्हान

Share This
पालिकेने बळाचा वापर करून बघावे?
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comवरळी येथील कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील ३५ बेकायदा फ्लॅटमध्ये राहणार्‍या रहिवाशांनी त्यांच्या घराच्या चाव्या त्वरित महापालिकेकडे सोपवाव्यात, अन्यथा १७ जून रोजी सकाळी ११.३0 नंतर कोणत्याही वेळी महापालिका फ्लॅट तोडण्याची कारवाई सुरू करेल, अशी नोटीस पालिकेने शनिवारी येथील रहिवाशांना दिली, मात्र येथील रहिवासी आपल्या घराच्या चाव्या पालिकेकडे अजिबात न देण्याच्या पूर्वीच्या भूमिकेवर आजही ठाम आहेत. 'आमच्या घरांच्या चाव्या पालिकेकडे सोपवणार नाही, हव्या असल्यास 'त्यांनी' बळाचा वापर करावा', असे आव्हान रहिवाशांनी दिले आहे. रहिवाशांची हीच भूमिका १७ जूनपर्यंत कायम राहिल्यास पालिका बळाचा वापर करणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
'महापालिका हे प्रकरण सामंजस्याने हाताळत आहे. येथील रहिवाशांनी पालिकेच्या नोटिशीला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांच्या घरांच्या चाव्या पालिकेकडे सुपूर्द कराव्यात. त्यांनी आपली या पूर्वीची भूमिका बदलावी यासाठी शनिवारी पुन्हा रहिवाशांना नोटीस बजावली आहे,' असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

तर या इमारतीमधील एका रहिवाशाने सांगितले, महत्त्वाच्या सर्व राजकीय पक्षांचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चांगला तोडगा निघेल, अशी चर्चा हे राजकीय नेते त्यांच्याशी करत आहेत. आम्ही याबाबत आशावादी आहोत. जर यातून काहीच तोडगा निघाला नाही आणि पालिकेला आमच्याकडून जबरदस्तीने चाव्या हव्या असतील, तर त्यांनी खुशाल बळाचा वापर करावा. येथील रहिवाशांच्या १४ मागण्या आहेत, त्या मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मान्य केल्या तर येथील सर्व रहिवासी आपापल्या घरांच्या चाव्या पालिकेकडे देण्यास तयार आहेत, असा पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे.

येथील सर्व रहिवाशांनी त्यांची घरे रिकामी करण्याची नोटीस पालिकेने यापूर्वीच बजावली आहे. हे ३५ बेकायदा फ्लॅट तोडण्यासाठी पालिकेला दोन कोटी २0 लाख रुपये खर्च येणार असून, तो येथील सर्वच रहिवाशांकडून वसूल करण्यात येणार आहे. पालिका ४८८ची नोटीस शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी बजावणार आहे. रहिवाशांनी त्याला प्रतिसाद दिला नाही तर १७ जून रोजी रहिवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages