मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) राजिव गांधी जीवनदायी योजनेच्या प्रशासकीय आणि वैद्यकीय नियम व अटींमध्ये पुर्नविचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्य राज्य मंत्री फौजिया खान यांनी आज विधान परिषदेत दिली.भाजपा आमदार ऍड आशिष शेलार यांच्या प्रश्नावर उत्तर देताना ही माहिती त्यांनी दिली.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे या योजनेचा लाभ प्रभावीपणे रूग्णांना होत नाही याकडे लक्षवेधीत याबाबत विधान परिषदेत लक्षवेधी सुचना उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेत भाग घेताना भाजपा आमदार ऍड आशिष शेलार म्हणाले की, या योजनेत मध्ये प्रशासकीय अटी क्लिष्ट आहेत त्यामुळे डॉक्टरांचा जास्त वेळ त्यामध्ये खर्च होतो.त्याचे परिणाम रूग्ण्सेवेवर होतात.तसेच या योजनेत अनेक आजारांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे वैद्यकीय नियम अटींची क्लिष्टताही वाढली आहे. म्हणून या योजनेच्या प्रशासकीय आणि वैद्यकीय नियम व अटींमध्ये सुधारणा करणार काय,असा प्रश्न आमदार शेलार यांनी यावेळी विचारला. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री फौजिया खान म्हणाल्या की, ही योजना लोकांसाठी जास्तीत जास्त उपयोगी ठरावी म्हणून सरकार त्यामध्ये बदल करण्यास तयार आहे.त्यासाठी योजनेच्या अटींचा फेरविचार करून त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. तसेच या योजनेबाबत ज्यांच्या सुचना आहेत अशा सर्व आमदारांची राज्यमंत्र्यांच्या स्थरावर बैठकही घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

