मुंबई : रेल्वे भाडेवाढी लागू होण्याच्या अगोदरच प्रवाशांनी पास काढण्याचा झपाटा लावला आहे. प्रवाशांनी अर्धवार्षिक आणि वार्षिक पासांना पसंती दिली आहे. यात पश्चिम रेल्वेवर गेल्या काही दिवसांत दोन्ही प्रकारच्या पासांसाठी झुंबड उडाली, मात्र त्या तुलनेत मध्य रेल्वेवर प्रवाशांचा प्रतिसाद दिसला नाही.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी एकाच दिवशी सहा महिन्यांचे १,६५0 आणि वार्षिक १,४५0 पासांची विक्री झाली. यापूर्वी दोन्ही पासांची दैनंदिन विक्री साधारणत: १00 आणि ५0 एवढीच होती. त्यामुळे प.रे.च्या सहा महिन्यांच्या पासाद्वारे प्राप्त होणारा महसूल ९५ हजारांवरून २२ लाख रुपयांपर्यंत पोहचला आहे, तर वार्षिक पासातून मिळणारा महसूल ४६ हजारांवरून एकाच दिवसात ४६ लाख रुपयांवर पोहोचला, तर त्रैमासिक पासांची विक्री ४,६00 वरून ९,५२५ वर गेली आहे. त्यामुळे रेल्वेस ३0 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज ४0 हजार पासांची विक्री होते. २१ जून रोजी ही विक्री ४२,६00 वर पोहोचून त्यातून १ कोटी ८९ लाखांचा महसूल प्राप्त झाला.
साधारणपणे पास विक्रीतून प.रे.स सुमारे १ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. त्याचप्रमाणे मासिक पासांची विक्री २१ जून रोजी ३0 हजारांवरून ३५,५00 वर पोहोचल्याचे अधिकार्याने सांगितले. मध्य रेल्वेवरही सहा महिन्यांच्या वार्षिक आणि अर्धवार्षिक पासांच्या विक्रीत शनिवारी किरकोळ वाढ झाली. केवळ एकाच दिवशी सहा महिन्यांच्या पासांची विक्री ८६४, तर वार्षिक पासांची विक्री ५५0 इतकी झाली. त्यातून महसुलाचा आकडा पुढे आला नसला तरी १४ जूनच्या तुलनेत ही वाढ फार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. १४ जून रोजी अर्धवार्षिक पासांची विक्री ८५८ तर वार्षिक पासांची विक्री ५४५ इतकी झाली होती. मध्य रेल्वेवरील जास्त अंतर आणि पासांची रक्कमही जास्त असल्याने त्यात फार वाढ झाली नसण्याची शक्यता आहे.
