राज्य माहिती आयोगाचे पालिकेला आदेश
मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com)
मुंबईमधील मोडकळीस आलेल्या, नादुरुस्त, व धोकादायक इमारतींची माहिती मुंबई महानगरपालिकेने २० दिवसांमध्ये द्यावी असे आदेश राज्य माहिती आयोगाचे बृहन्मुंबई आयुक्त अजितकुमार जैन यांनी दिले आहेत.
दिनांक २९/८/२०१२ ला माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांनी पालिका आयुक्त कार्यालयातील जन माहिती अधिकाऱ्यांकडे अर्ज करून मुंबई मधील धोकादायक, नादुरुस्त व मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या, किती धोकादायक इमारती पाडण्यात आल्या, किती इमारती पाडण्याच्या बाकी आहेत, सिद्धार्थ विहार वसतिगृह धोकादायक ठरवले कसे याबाबतची सविस्तर माहिती मागविली होती.
३० दिवसात माहिती देणे बंधनकारक असताना जन माहिती अधिकाऱ्यांनी दिनांक ३/९/२०१२ ला सर्व विभाग कार्यालयांना माहिती देण्यासाठी पत्र पाठवण्यात आल्याची माहिती गायकवाड यांना पाठवली होती. दिनांक ९/१०/२०१२ ला प्रथम अपील दाखल केल्यावरही सहाय्यक आयुक्तांनाच माहिती देण्याचे अधिकार असल्याचे सांगून अपील निकाली काढण्यात आले होते.
याबाबत दिलीप गायकवाड यांनी दिनांक ३१/१२/२०१२ रोजी राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल केले होते. या अपिलाच्या सुनावणी दरम्यान २४ वार्ड पैकी १० वार्ड ने समाधानकारक माहिती दिली नसल्याचे तसेच १४ वार्डने माहितीच दिली नसल्याचे समोर आले होते. पालिकेकडे माहिती अधिकारात माहिती देत नसल्याने माहिती अधिकार कायद्याची पालिका अंमलबजावणी योग्य प्रकारे करत नसल्याने धोकादायक, नादुरुस्त, मोडकळीस आलेल्या इमारतींची सविस्तर माहिती दिलीप गायकवाड यांना २० दिवसात मोफत देण्याचे आदेश जैन यांनी दिले आहेत.

