मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोमुळे बेस्टप्रमाणेच रेल्वे प्रवाशांच्या संख्येतही काही प्रमाणात घट झाली आहे. या मेट्रोमुळे दादर स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. याउलट घाटकोपर स्थानकात प्रवाशांच्या लोंढय़ात प्रचंड वाढ झाली आहे. परिणाम स्वरूप घाटकोपर रेल्वे स्थानक गर्दीचे नवे केंद्र ठरत आहे. दादरमधील प्रवासी संख्येत सुमारे दीड लाखांनी कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दादर स्टेशनवरील दैनंदिन प्रवासी संख्येत सुमारे दीड लाखांनी घट झाल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यामुळे पासधारकांच्या संख्या कमी होणार नसल्याचे दिसून येते. दादर हे प्रमुख स्टेशन असल्याने पासधारकांची संख्या कमी होण्याची शक्यता नाकारली जाते. एकट्या दादर स्टेशनवर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून येणार्या प्रवाशांची संख्या सुमारे १५ लाख आहे. त्यापैकी तिकीटधारकांची संख्या केवळ २५ ते ३0 टक्के असल्याने महसुलावर परिणाम होणार नसल्याचे दिसते.
