मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मेट्रोचा आरामदायी, सुखद प्रवास सुरू झाला आणि मेट्रोने बेस्टचे प्रवासी पळविण्यास सुरुवात केली. अंधेरी-घाटकोपर प्रवासात होणारी वाहतूक कोंडी आणि त्यात अडकणारे प्रवासी यांना मेट्रोचा पर्याय मिळाला आहे. त्यामुळे या मार्गावरील बेस्टचे प्रवासी घटले आहेत. प्रवाशांची घटलेली संख्या भरून काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने या मार्गावर कमी अंतरावरील बसमार्ग चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्सोवा ते घाटकोपर हे अंतर मेट्रोने केवळ २१ मिनिटांत पार करता येते. त्यामुळे अंधेरीसह चकाला, असल्फा, मरोळ, साकीनाका आणि घाटकोपर येथील प्रवाशांनी मेट्रोचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे अंधेरीतील आगरकर चौक ते घाटकोपर पश्चिम जोडणार्या बसमार्ग क्रमांक ३४0 ची प्रवासी संख्या कमी झाली आहे. अंधेरी ते घाटकोपरसाठी दीड तास लागतो, परंतु मेट्रोमुळे आता फक्त २0-२२ मिनिटांत हे अंतर पार होते. ९ जून रोजी या बसच्या प्रवासी संख्येत १0 हजार ५00 प्रवाशांनी घट झाली आहे. ही घट भरून काढण्यासाठी बेस्टने नवे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.
या स्थितीचा आढावा घेत बेस्टने कमी अंतरावरील मार्गावर बससेवा सुरू करण्यासंदर्भात आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. लांब अंतरासाठी मेट्रो उपयुक्त ठरणार असल्यामुळे मधल्या अंतरावरील प्रवाशांना जादा सेवा पुरवून प्रवासी संख्या वाढविण्यावर प्रशासन भर देणार आहे. बेस्ट प्रशासनाने अंधेरी ते घाटकोपरदरम्यान मेट्रो स्थानकाजवळून विविध मार्गांवर सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना या स्थानकांवरून एमआयडीसीसह अन्य ठिकाणांपर्यंत पोहोचविण्यासाठी बसमार्गाचा विचार करण्यात येत आहे.
