राज्यात रोज चार लाचखोरांवर कारवाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात रोज चार लाचखोरांवर कारवाही

Share This
राज्यात सध्या सरासरी रोज चार लाचखोर सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडत आहेत. राज्यात 2013 या संपूर्ण वर्षात जेवढे लाचखोर सापडले ती संख्या 2014 च्या सहा महिन्यांतच गाठली जाण्याची शक्‍यता आहे. लाचखोरांच्या विरोधात जनतेत असलेली चीड व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पालटलेले रूप यामुळे हे शक्‍य झाल्याचे दिसून येत आहे. 
याबाबतची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. "एसीबी‘ने राज्यात जानेवारी ते जून 2014 या कालावधीत एकूण 534 सापळे यशस्वी करून 722 लाचखोरांना पकडले. या विभागाच्या इतिहासात सन 2013 या संपूण वर्षात 583 सापळे रचून गुन्हे दाखल झाले होते. पाचशेच्या पुढे पहिल्यांदाच कारवाईचा आकडा गेल्याने हा "विक्रम‘ समजला गेला होता. मात्र 2014 च्या सहा महिन्यांतच या कामगिरीच्या जवळपास संख्या पोचली आहे. गेल्या वर्षी 21 जूनपर्यंत 267 सापळे रचून 341 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. या तुलनेत यंदाची कारवाई दुप्पट ठरली आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून प्रवीण दीक्षित यांनी ऑक्‍टोबर 2013 मध्ये कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी या विभागातच आधी शिस्त आणली. नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीवर निर्णय घेणे सक्तीचे केले. अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेतले. "एसीबी‘च्या कारवाईसाठी जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, हे ओळखून टोल फी क्रमांक, ऑनलाइन तक्रारी घेणे सुरू केले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील युनिटला दोन मोबाईल दूरध्वनी जनतेच्या संपर्कासाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे गडचिरोलीपासून ते मुंबईपर्यंतच्या नागरिकांना तक्रार करणे सुलभ झाले. लाचखोरांवर कारवाईत पुणे आणि नाशिक या विभागांत स्पर्धा आहे. या वर्षी सर्वाधिक 90 सापळे हे नाशिक विभागात झाले. त्या खालोखाल पुण्यात 80, औरंगाबाद 73, ठाणे 66, नांदेड 64, नागपूर 60, अमरावती 56 आणि मुंबईत 44 सापळ्यांत लाचखोरांना पकडण्यात आले. 

वर्ष व लाचखोरांवरील सापळे 2014- 534 (22 जूनपर्यंत) 
2013- 583 
2012- 489 
2011- 479 
2010- 486 
2009- 405

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages