मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) वरळी परिसरातील १२१ बी. डी. डी. चाळींमध्ये कमी अधिक प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची रहिवाशांची तक्रार लक्षात घेऊन मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी आज(दिनांक १७.०६.२०१४) बी. डी. डी. चाळींना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व महापालिकेच्या संबंधित अधिकाऱयांशी सविस्तर चर्चा केली. त्यानुसार सदर बाब ही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशीही संबंधित असल्याने सदर बाबतीत तातडीने संयुक्त बैठक बोलविण्याचे व आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश महापौरांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
वरळी परिसरात १२१ बी. डी. डी. चाळी असून या प्रत्येक चाळीत साधारणपणे ९० कुटुंबे राहतात. या परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबद्दल नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या व त्याबाबत महापालिकेद्वारे आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करण्यात आली होती.मात्र, दूषित पाण्याचा प्रश्न न सुटल्याने महापौर सुनिल प्रभु यांनी सदर भागातील माजी नगरसेवक आशिष चेंबुरकर, जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे, उप जल अभियंता(शहर) संजय आरते आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी यांच्यासमवेत सदर भागाचा पाहणी दौरा केला व स्थानिकांशी सविस्तर चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
याबाबतीत महापालिकेचे अधिकारी व अभियंता यांनी महापौरांना दिलेल्या माहितीनुसार सदर भागात जलवाहिन्या दुरुस्तीची आवश्यक ती सर्व कामे वेळोवेळी करण्यात आली. मात्र, दूषित पाण्याचा प्रश्न न सुटल्याने आधुनिक अभियांत्रिकी पद्धतींचा अवलंब करुन दूषित पाण्याचे कारण शोधले असता सदर भागात महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील मलनिःसारण वाहिन्यांमधून गळती होत असून त्यातील पाण्यामुळे महापालिकेच्या जलवाहिन्यांमधील पाणी दूषित होत असल्याचे लक्षात आले.
दूषित पाण्यामुळे या भागातील रहिवाशांच्या आरोग्याला गंभीर धोका उत्पन्न होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबंधित अधिकारी व महापालिकेचे संबंधित अधिकारी यांच्यासमवेत तातडीने संयुक्त बैठक बोलविण्याचे व आवश्यक ती उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश महापौर सुनिल प्रभु यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
